`डड्डा हे माझ्या मुलाचं टोपण नाव. पेनाला टोपण लावतात त्याप्रमाणे जन्मताच मी त्याला हे नाव चिटकवलं आहे. `डड्डा माझा पहिला मुलगा. `मुलगा म्हणून त्याचा जसा जन्म झाला तसाच `वडील म्हणून माझाही जन्म झाला. त्याचा वाढदिवस आणि माझ्या बायकोचा `आई होण्याचा अन् माझा `बाबा होण्याचाही वाढदिवस एकच ! `डड्डाच्या खांद्यावरचा अवयव हा केवळ दाखविण्यापुरता नसून वापरण्यासाठीही आहे याचा प्रत्यय
मला तो पाळण्यात असल्यापासूनच आला आहे. नाना प्रश्न विचारून तो मला भंडावत
असतो. त्याच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देता देता माझ्या नाकी नऊ येतात.
आपल्या देशात अनेक मुले उत्कृष्ट क्रिकेट खेळत असताना सचिन तेंडुलकरच्या
`अर्जुनचेच चित्रवाहिन्यांवर कौतुक का ? या त्याच्या बाळबोध परंतु विचार
करायला लावणार्या प्रश्नाला समर्पक उत्तर देणे मलाही जमले नाही. `आयबीएन
लोकमत आणि `हिस्ट्री चॅनेल्सवर सुरू असलेल्या `द ग्रेटेस्ट इंडियन या
मतचाचणीच्या स्पर्धेत सावरकरांचे नाव का नाही ? किंवा या कार्यक्रमात
एस.एम.एस. आणि मिस कॉल्डद्वारे ए. आर. रेहमानला अधिक मते पडली तर रेहमान
पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जयप्रकाश नारायण, लोहिया, मदर तेरेसा, ए. पी.
जे. अब्दुल कलाम ही मंडळी `पानीकम ठरतील काय ? या प्रश्नावरही त्याने माझी
विकेट काढली. ठाण्याच्या वन रुम किचनमध्ये झोपा काढणार्या `डड्डाचे `फेसबुक
स्टेटस् `एन्जाईन हॉलिडे इन रोम असे आहे. त्याबाबत त्याला विचारले असता,
आपणच आपले मार्केटींग करायला हवे, हल्लीचा जमाना खूप बदललाय. जाहिरातीच्या
या युगात स्वतःची जाहिरात करायला यायला हवी असा खुलासा त्याने करताच मीच
त्याच्यापुढे त्याचे `बाळ बनलो. `चिंध्या पांघरून सोने विकायला बसलो तर
गिर्हाईक फिरकेना, सोने अंथरून चिंध्या विकायला बसलो तर गिर्हाईक पेलवता
पेलवेना, ही कवी सुधाकर गायधनीला आलेली प्रचिती मलाही आली. तर सांगायचा
मुद्दा असा की, आधुनिक युगातील माझ्या मुलाला सतत प्रश्न भेडसावत असतात.
प्रश्नांच्या विळख्यात तो पुरता गुरफटून गेलेला आहे. 65 वर्षाच्या
स्वातंत्र्याने त्यापुढे नुसतेच प्रश्न निर्माण करून ठेवले आहेत. निवडून
येणार नाही हे नेमके ठाऊक असतानाही पी. संगमा हे राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार
म्हणून लढत का देत आहेत ? असा प्रश्नही त्याला हल्ली पडला होता. यापूर्वी
`डड्डाला पडलेला प्रश्न मोठा मार्मिक होता.आयुष्यात आपल्या पत्नीला चार
ओळीचे पत्र न लिहिणारे मंत्री नामवंत उद्योगपतींवरील विशेषांकात स्तुती
करणारे पानभर लेख कसे काय लिहितात ? या त्याच्या प्रश्नावरही मी अबोल झालो.
आई-बाबा दोघेही पत्रकार असल्यामुळे `डड्डाची जिज्ञासा मोठी बनवलेलीच असते.
प्रत्येक बाबींवर प्रश्न निर्माण करून उत्तरांचा पाठलाग करण्याचे बाळकडू
त्याला कदाचित मिळाले असावे. त्यामुळे क्रीडा, चित्रपट, रंगभूमी, राजकारण
आणि समाजकारण या क्षेत्रासंबंधातील अनेक प्रश्न त्याला पडत असतात. `ऍन्टी
वायरस विकणारी मंडळीच वायरस निर्माण का करतात ? अथवा भारतात काहीही झाले
तरी त्यामागे पाकिस्तान, परकीय हात अथवा नक्षलवादी कारवाया हेच कारण का
पुढे केले जाते ? अंथरूणाला खिळून पडलेली महनीय व्यक्ती दगावल्यानंतर ही
पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे ?
असाच शोकसंदेश का बरे देतात ? `एन्काऊंटरमध्ये कुख्यात गुंडांचे साथीदार
नेमके अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी कसे होतात ? ज्या ज्यावेळी
नवीन चित्रपट येऊ घातला जातो त्या त्यावेळी त्या चित्रपटातील प्रमुख
नट-नटय़ांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा का सुरू करण्यात येते ? सिरियल्स
मधील सासु-सुनेची भांडणे अथवा उच्चभ्र मंडळींची लफडी एन्जॉय करण्यात सर्वच
महिला वर्गांना धन्यता का वाटते ? मोबाईलवर फोन आल्यानंतर सर्वचजण थोडे
तरी बाजूला होऊन का बोलतात ? भाजी घेताना समस्त महिला वर्ग भय्यांशी
घासाघीस करतात. मात्र त्यांना नवर्याच्या पैशावर शॉपिंग करायला का आवडते ?
असंख्य महिलांना जावई आपल्या पतीसारखा हवा असतो, मात्र सून आपल्यासारखी का
नको असते ? सूर्य स्थिर असतानाही आपण सूर्य उगवला, मावळला असे का म्हणतो ?
जगात एक महिला एका सेकंदाला चार बालकांना जन्म देते असे म्हणतात मग त्या
महिलेचा शोध घेऊन तिला ठार का मारत नाहीत ? असे असंख्य प्रश्न `डड्डाला पडत
असतात. त्याच्या या प्रत्येक प्रश्नाला नेमके उत्तर देणे माझ्या
आवाक्याबाहेरचे असते. त्यामुळेच त्याने प्रश्न विचारल्यावर मी म्हणतो, आय
डोन्ट नो, माय सन !
- भगवान निळे
- भगवान निळे
No comments:
Post a Comment