Friday, June 28, 2013

का होतात लैंगिक अत्याचार?

 


स्त्रीदेहाची शास्त्रीय ओळख न झालेली, स्त्रीसुखापासून वंचित असलेली, कामभावनेचा अवास्तव बाऊ करणारी आणि ज्यांना खर्या अर्थाने प्रेम मिळाले नाही, अशी माणसे बळजबरीने आपली वासना शमविण्यासाठी बलात्कार करतात. दिल्लीत सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर समस्त महिला वर्गाचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. देशात गहजब माजला. पंरतु गेंडय़ाची कातडी पांघरलेल्या सरकारला आणि धर्म आणि संस्कृतीच्या ठेकेदारांना हे नेमके ठाऊक होते की, भारतीय जनतेचा असंतेष हा अळवावरच्या पाण्यासारखा क्षणिक असतो. तो असंतेष कधीच समर्पक आणि योग्य न्याय मिळेपर्यंत शेवटपर्यंत तग धरत नाही. हा असंतेष मतदानाच्या पेटीतूनही कधी प्रगट होत नाही. त्यामुळेच राजकारणी मंडळी असले आंदोलन म्हणजे पेल्यातील वादळ समजून काही काळ शांत बसतात. ंिकंबहुना थातूरमातूर मलमपट्टी करून आश्वासनांचे गाजर दाखवितात. आम्ही सुशिक्षित पांढरपेशी मंडळी मग सर्वकाही विसरून दुसरी घटना घडत नाही तोपर्यंत भारतीय क्रिकेट संघाची हाराकारी, सलमान खानच्या लग्नाचा न संपणारा विषय, बिग बॉसमधील भांडणे, पुढार्यांची भ्रष्टाचार प्रकरणे, कॉमेडी सर्कसमधली पांचट विनोद, बुवाबाजांचे सतसंग आणि वाढत्या महागाईविरूध्द बोटे मोडण्यापलिकडे काही करीत नाही. दिल्लीतील सामूहिक पाशवी बलात्काराच्या प्रकरणानंतरही आपण हेच केले.
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील 23 वर्षीय तरूणी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आणि आपल्या अत्यंत गरीब कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी राजधानी दिल्लीत आली असता तिच्यावर सामूहिक पाशवी बलात्कार करण्यात आला. हा बलात्कार इतका पाशवी होता की नराधमांनी तिच्या गुप्तंागात लोखंडी सळया खुपसल्या. या अघोरी कृत्यानंतर त्या दुदैवी युवतीने सिंगापूर येथील रूग्णालयात अखेरचा श्वास घेऊन भारताचा आणि संपूर्ण जगाचा निरोप घेतला.तिच्यावर अत्याचार करणार्या नराधमांच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रियाही सुरू झाली आहे. अशाच प्रकारची तत्परता अन्य खटल्यांमध्येही दाखवावी असे सर्वसामान्यांना वाटले तर त्यात गैर नाही.
येत्या फेबुवारी महिन्यात या मुलींचा विवाह होणार होता. बलात्काराच्या या `अपघाती’ घटनेनंतर संपूर्ण देशात असंतोषाची लाट उसळून जनतेचा उद्रेक रस्त्यावर आला. मेणबत्या पेटवून, फेसबुकवर सरकारला शिव्या घालून , हल्लाबोल करून, आणि बलात्कारीत आरोपींना नपुंसक बनविण्याची अथवा फासावर लटकविण्याची मागणी करून अनेकांनी आपले सामाजिक `कर्तव्य’ पार पाडले. जसे दिवस जातील तसे आपण हे प्रकरणही विसरून जाऊ. `ती’ दुदैवी मुलगी मातीआड झाली आहे. आरोपींनाही यथावकाश शिक्षा होईल. आपण अशाच प्रकारच्या आणखी एका भयानक प्रकरणाची वाट पहात असू. कारण, दिल्लीत सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशात बलात्काराचे प्रकार थांबले नाहीत. बलात्कार करणार्याला देहदंडाची शिक्षा नाही म्हणून बलात्काराचे प्रकार होत आहेत असे नाही. निर्घृण खून करणार्यांना फाशीची शिक्षा आहे म्हणून खून करण्याचे प्रकार थांबले आहेत अथवा ते कमी झाले आहेत असे नाही. बलात्कार्यांना देहदंडाच्या शिक्षेची `तालीबानी ‘मागणी करून आपण आपल्यातील हिंस्त्र जनावराला तर जागे करीत नाही ना? शिक्षा वाढविल्याने गुन्हे कमी होत नाहीत अथवा गुन्हेगारांना चपराकही बसत नाही. गुन्ह्याच्या प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सामाजिक परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. 13 प्रकरणात चुकीची फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती असे सर्वोच्च न्यायालयानेच कबूल केले आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देऊन `सामूहिक हत्या’ करणे हे कोणत्याही सभ्य समाजाला मानवणारे नाही.
बलात्कार करणारा माणूस 24 तास बलात्कार करण्यासाठी सावज शाधत नसतो. आयुष्यात त्याने एकदा किंवा फार तर दुसर्यांदा बलात्कार केलेला असतो. हे निर्घृण कृत्य करायला त्याला कोणती परिस्थिती भाग पडली याचाही विचार करायला हवा. बलात्काराची प्रक्रिया प्रथम मेंदूत घडते. नंतर संधी मिळताच ती वास्तवात उतरते. बहुसंख्य पुरूष मनातल्या मनात महिलांवर बलात्कार करीत असतात. गर्दीत महिलांना चोरटा स्पर्श करून अथवा लांब राहून त्यांच्या देहाचे नेत्रसुख घेणारी मंडळीही आपल्या समाजात कमी नाहीत. आपल्या कामुक भावनांना शांत करण्यासाठी अनेकजण चित्रपट, दूरचित्रवाणी , इंटरनेट अथवा पुस्तके आणि अश्लिल सिडीची मदत घेत असतात. स्त्रीसुख हे जगातील परमोच्च सुख असल्याचे मानल्यामुळे हा गोंधळ होतो. तहानभूक याचप्रमाणे शरीरसुख ही एक मुलभूत गरज आहे, इतकेच मानायला हवे. त्याला अवास्तव महत्त्व प्राप्त झाल्याने हा घोटाळा होतो. स्त्रीदेहाची शास्त्रीय ओळख न झालेली, स्त्रीसुखापासून वंचित असलेली, कामभावनेचा अवास्तव बाऊ करणारी आणि ज्यांना खर्या अर्थाने प्रेम मिळाले नाही, अशी माणसे बळजबरीने आपली वासना शमविण्यासाठी बलात्कार करतात.
आपल्या कायद्यात प्रत्येक गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे. महिलांकडे कामुक वासनेने पाहणे, तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, महिलांना पाहून गलिच्छ शेरेबाजी करणे शिटी वाजविणे या गुन्ह्याखालीही कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. असे असतानाही महिलांचे लैंगिक शोषण काही थांबलेले नाही. नुसते कायदे करून हा प्रश्न सुटणारा नाही. मानसिकता बदलण्यासाठी कायदे उपयोगाचे नसतात. आणि आपली प्राचिन संस्कृती आणि धर्म तर स्त्री – पुरूषांच्या असामनतेवरच आधारीत आहेत. आपण माणूस आहोत आणि माणूसच राहणार . सभ्य, सुसंस्कृत माणूस होण्याचा प्रयत्न करायला हवा. कोणताही माणूस जन्मतःच रानटी जनावर म्हणून जन्म घेत नाही. अथवा कोणीच जन्मतः `अण्णा हजारे’ नसतो.
महिलांचे लैंगिक शोषण, महिला अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणाकडेही निरपेक्ष आणि स्वच्छ दृष्टीने पहायाला हवे. पुरूषप्रधान संस्कृतीवर बेतलेल्या आपल्या धर्मग्रंथांचाही नव्याने विचार व्हायला हवा. आपल्या चाली-रिती, धार्मिक बंधने, पुराणकथा, रिवाज या सर्व बाबींचा आजच्या आधुनिक युगात शास्त्रीय कारणमीमांसा करून विचार करायला हवा.
`पती हाच परमेश्वर आहे ‘अशी शिकवण देणारी आपली संस्कृती पुरूषानेही लग्नापर्यंत कौमार्य राखले पाहिजे असे का सांगत नाही. स्त्रीचे कौमार्य ही खूप मोठी बाब असून ती जिवापाड जपायला हवी नाही तरी तुम्ही अपवित्र व्हाल असे महिलांनाच का शिकविले जाते? लग्नाच्यावेळी मंगळसुत्राचे लोढणे गळ्यात बांधून महिलांनाच कायमचे खुंटीला का बांधण्यात येते? ` सावध हरणे सावध गं, करील कुणीतरी पारध गं, असल्या गाण्यांमधून त्यांना का भीती दाखविली जाते याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. बलात्कार झाल्यानंतर आत्महत्या करायला जाणारी नायिका किती काळ आपण चित्रपट आणि सिरियलमधून पाहणार? स्त्रीची अब्रु म्हणजे `काचेचे भांडे’ या प्रतिमा आपण कधी विसरणार?
स्त्री-पुरूषात समानता हवी या मताला कुणीही विरोध करणार नाही. शारीरिकदृष्टय़ा महिला आणि पुरूष यात फारसा फरक नाही. परंतु जी गोष्ट आपल्याकडे नाही त्याबाबत मानवाला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. काळ्या मुलींना गोरी मुले आवडतात तर सिंगल फसली माणसाला सिक्स पॅकचे आकर्षण असते. स्त्री आणि पुरूषांची जननेंद्रिये भिन्न असतात. भिन्न जननेंद्रियांबद्दल एकमेकांना आकर्षण असते. पुरूषांना दाढी-मिशा असतात, महिलांना नसतात. पुरूषांना दाढी-मिशा असल्यामुळे आपण महिलांपेक्षा श्रेष्ठ आहोत हे दाखविण्यासाठी ते मिशा राखून त्यावर ताव मारतात. महिलांनाही मिशा भादरलेले पुरूष `बायकी’ वाटतात. त्यामुळे अंत्यत मागासलेल्या मुस्लीम राष्ट्रंमध्ये दाढी-मिशा राखण्यावर अधिक भर दिला जातो. याच राष्ट्रंामध्ये महिलांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात येते. पुरोगामी, शिक्षित आणि पुढारलेल्या राष्ट्रांमध्ये पुरूषमंडळी अशाप्रकारे मिशांना ताव मारून पौरूषत्व गाजवत नाहीत.
आपण अधिकाधिक आकर्षक बनून पुरूषाला कसे मोहित करू शकतो याची कला हळूहळू मुलींना अवगत होते. प्रत्येक पुरूष बुध्दिमत्ता, हुशारी, करारीपणा यापेक्षा बाह्य आकर्षणालाच भुलतो असा गोड गैरसमज मुलींमध्ये पसरलेला असतो. बहुतांश पुरूष दुदैवाने सौंदर्य, कामुक हावभाव, रेखीव शरीर , लज्जा, नाजुकता याच अंगाने महिलांकडे पाहतात. ताजमहलाच्या सौंदर्याचा उपभोग घेताना तो तयार करण्यासाठी हजारों कामगारांनी गाळलेल्या घामाची आठवण ठेवायला हवी. शरिराच्या पलीकडे पाहता आले तरच नेमका माणूस उमगतो.
शरीराच्या पलीकडे निरपेक्ष प्रेम नावाची गोष्ट असते. भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये निसर्गानेच प्रजननासाठी ओढ निर्माण केली आहे. हे आकर्षण सापेक्ष असते. पवित्र असते. आकर्षण, अभिलाषा आणि वासना यात मूलतः मोठा फरक असतो. आकर्षणानंतर सहवासातून प्रेम निर्माण होते. तर आकर्षणानंतर सहवास लाभला नाही तर त्याची जागा वासना घेते. या वासनेतूनच विकृती निर्माण होऊन महिलांवरील लैंगिक छळाचे रूप धारण करते.
पुरूषांचीच नव्हे, तर महिलांचीही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपण पुरूषांच्या तुलनेत कमी आहोत. ही भावना महिलांनी प्रथम बदलायला हवी. पुरूषांनी उठून आपल्याला बसण्यासाठी जागा द्यावी असे प्रत्येक महिलेला वाटत असते. आपल्याला रेल्वे, बस आदी ठिकाणी राखीव जागा अथवा वेगळे डबे हवेत असा महिलांचा अट्टाहास असतो. कष्टाच्या कामांसाठी पुरूषांनी पुढे येऊन आपल्याला मदत करावी असेही त्यांना वाटत असते. त्यावेळी महिलांना समानतेचा विसर पडलेला असतो. पुरूषांनी प्रत्येकवेळी आपल्याला मदत करावी यातच सौजन्य आहे, असे महिलांना वाटते. महिलांनीही आता पुरूषांच्या मदतीची प्रतीक्षा करणे हळूहळू सोडून द्यायला हवे.
शारिरीकदृष्टय़ा पुरूष महिलांपेक्षा वरचढ असला तरी अन्य बाबतीत महिला समान आहेत हे विसरता कामा नये. पुरूष आणि महिला जर समान असतील तर आपला समाज महिलांवरच नैतिकतेची बंधने का लादतो? चारचौघात घुसून रस्त्यावरचा मदार्याचा खेळ महिला का पाहू शकत नाहीत. चारचौघात हातावर टाळी मारून मोठमोठय़ाने हसण्यात महिलांना का गैर वाटते? बालवयातच त्यांना नीट बस, जास्त दात काढू नकोस, संध्याकाळ होण्याच्या आत घरात ये, मुलांपासून चार हात लांब बस अशी संस्कारीत वाक्ये का ऐकवावी लागतात. याची सुरूवात लहानपणापासून होते. बालमनावर स्त्री-पुरूष असमानतेचा धडा गिरविला जातो. वर्गात मुला-मुलींनी एकत्र बाकावर बसायचे नाही, एकत्र खेळायाचे नाही असे अप्रत्यक्षरित्या सांगण्यात येते. अशाप्रकारच्या असंख्य लहान – सहान गोष्टीतून भेदभावाचे बीज रूजले जाते. महिलांनी आता आपला मुलगा आणि मुलगी यात लैंगिक भेदभाव न करता दोघांनाही प्रत्येक बाबतीत समान अधिकार द्यावेत. घराबाहेर श्वापदे दबा धरून बसली आहेत तू बाहेर पडू नकोस नाहीतर कुणाला तरी सोबत घेऊन जा अशी भीती घालणे योग्य ठरणार नाही.जोपर्यंत आपण बलात्कार हा एक `अपघात’ आहे असे मानत नाही तोपर्यंत आपण या प्रश्नाची नेमकी सोडवणूक करू शकणार नाही. अपघातात हात, पाय तुटला म्हणून कुणी जगणे संपले असे मानत नाही. बलात्कार झाला म्हणजे सर्व काही संपले. जगण्यात राम उरला नाही, आपण अपवित्र झाला oही भावनाच पुसून टाकायला हवी. उलट बलात्कार झाल्यानंतर मोठय़ा धाडसाने समोर येऊन गुन्हेगारांना अद्दल घडविण्यासाठी लढण्यास प्रवृत्त व्हावे. समाज काय म्हणेल याची चिंता करून नये. समाज मेणबत्या पेटवून पाठिंबा देण्याचे नाटकही करील आणि नंतर मिटक्या मारीत बलात्काराच्या बातम्या मोठय़ा चवीने वाचेल आणि पाहिल. बुरसटलेल्या समाजाच्या प्राचीन विचारांना मूठमाती देण्याची आज गरज आहे. आधुनिक जग झपाटय़ाने मार्गक्रमण करू लागले आहे. नवा आधुनिक विचारच भावी पिढीला तारू शकेल यात शंका नाही.

No comments:

Post a Comment