शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख
राज ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चेचे
गुर्हाळ सुरू झाले आहे.
आगामी निवडणुकीत आपला भाऊ आणि राजकीय वैरी असलेल्या राजसोबत युती करण्याचे
साकडे उध्दवने `सडेतोड’ मुलाखतीतून घातले आहे. मराठी माणूस आणि
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिवसेना – मनसे यांनी एकत्र यावे ही
बहुतांश शिवसैनिक, मनसेसैनिक आणि भाजपाची इच्छा आणि अपेक्षा आहे. मात्र,
उध्दव आणि राज यांच्या आजुबाजूला असलेल्या कोंडाळ्यातील किती जणांना या दोन
भावांनी एकत्र यावे असे वाटते, हा संशोधनाचा विषय आहे. या भावांनी एकत्र
यावे असे जाहीरपणे म्हणायचे व त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न न करता खाजगीत
काडय़ा घालायचे उद्योग करायचे हे दोन्ही पक्षातील दुसर्या फळीतील नेत्यांचे
उद्योग आहेत. आपल्या अवतीभोवती भाट आणि हुजर्यांचा राबता ठेवण्याचा
बहुतांश नेत्यांचा आवडीचा छंद असतो.त्याला राज आणि उध्दव अपवाद नाहीत.
`चाणक्य’ आणि `चाणाक्ष’ असलेल्या दुसर्या फळीतील मंडळीच्या हितसंबंधांवर
जेव्हा आक्रमण होते त्यावेळी ही मंडळी आपल्या नेत्यांचे कान भरवून आपापला
स्वार्थ साधत असतात. या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात
असतानाच एकमेकांकडे पाठ फिरविलेले दोघे भाऊ बाळासाहेबांच्या गैरहजेरीत
मांडीला मांडी लावतील हे पटत नाही. राज ठाकरे यांनी स्वतःचे वेगळे बस्तान
का मांडले याचा प्रथम विचार व्हायला हवा. विठ्ठलाला मानणार्या या
निष्ठावान भक्ताने `बडव्यां’ना कंटाळून सवतासुभा निर्माण केला आणि
नेत्तृत्वाच्या हव्यासापोटी रणशिंग फुंकले. आता विठ्ठल नसला तरी बडवे ठाण
मांडून बसलेले आहेतच. विशेष म्हणजे, बाळासाहेबांच्या निधनानंतर ही फाटाफूट
झाली असती तर ते समजण्यासारखे होते. परंतु बाळासाहेब हयात असतानाच
शिवसेनेतून फुटून नवा पक्ष स्थापणार्या राजला बाळासाहेबांनाही थोपविता आले
नाही हे वास्तव आहे. राजकारणात सर्व काही शक्य आहे हे मान्य केले तरीही जे
बाळासाहेबांना जमले नाही, ते उध्दव कसे काय वास्तवात उतरवू शकतात हा मोठा
प्रश्न आहे. त्यावेळच्या आणि आताच्या परिस्थितीत फारसा कोणता बदल झाला आहे ?
एका म्यानात दोन तलवारी बसत नसल्यामुळे दोन म्यान आवश्यक असतात. कारण,
ठाकरे घराण्यातील कोणत्याही व्यक्तीला दुसर्याचे आदेश मानण्याची सवय नाही.
हीच बाब दलित नेत्तृवाला लागू पडते. त्यामुळेच रिपब्लिकन चळवळीत पायलीचे
पन्नास स्वयंघोषित नेते आहेत.मनसे महायुतीत आले तर रामदास आठवले यांच्या
रिपब्लिकन पक्षाचे काय होणार ? ही मोट कशी बांधता येईल ? आठवले यांनी
वेळोवेळी राज ठाकरे यांच्या राजकारणाला विरोध केला आहे. मनसे एकत्र
आल्यानंतर आठवले यांना महायुतीने खिजगणतीतही ठेवले नाही तर आठवले यांची गत
शेपूट नसलेल्या बैलासारखी होईल. उध्दवने मुलाखतीद्वारे नेमकी हीच वेळ का
साधली याचाही विचार व्हायला हवा. बाळासाहेबांच्या निधनांनंतर शिवसेनेत मोठी
फूट पडून त्याचा फायदा मनसे आणि राष्ट्रवादीला मिळेल अशी शक्यता निर्माण
झाली आहे. नाशिक आणि औरंगाबादेत याचा प्रत्यय आला आहे. सेनेचे काही खासदार
आणि आमदार फुटण्याच्या मार्गावर असून ते राष्ट्रवादीच्या संपर्कात
असल्याची जोरदार चर्चा आहे. ही गळती थांबविण्यासाठी मनसे-सेना युतीचा
बागुलबुवा उभा तर करण्यात आला नाही ना, अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे.
काँगेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखण्यासाठी मराठी आणि हिंदू मतांचे
विभाजन होता कामा नये हा एकमेव सार्थ हेतू असेल तर त्यासाठी प्रामाणिक
प्रयत्न दोन्ही बाजुने व्हायला हवेत. मुलाखती देऊन कशाप्रकारे मनोमीलन होईल
हे समजण्याच्या पलिकडे आहे. ठाणे पालिका निवडणुकीत मनसेने मदतीचा हात
पुढे करून सेनेला सत्तेपर्यंत पोहचण्याचा मार्ग मोकळा करून दिला होता.
मात्र नाशिकमध्ये सेनेला मदतीची परतफेड करता आली नाही. बाळासाहेबांची
प्रकृती ठिक नसताना राज अनेकवेळा `मातोश्री’वर दिसले. उध्दवच्या आजारपणातही
ते त्यांच्यासोबत दिसले. ठाकरे यांच्या अन्त्ययात्रेतही दोघे भाऊ एकत्र
दिसले. कु टुंबातील एक सदस्य म्हणून या गोष्टी ठिक असतात. पण राजकीयदृष्टया
याला मनोमीलन कसे म्हणता येईल? ठाकरे घराण्याला महाराष्ट्राच्या
राजकारणाची पुरेपूर जाण आहे. राज ठाकरे हे मुत्सद्दी आणि आक्रमक नेते आहेत.
उलट उध्दव हे संयमी आहेत. आक्रमकता हा शिवसेनेच्या राजकारणाचा स्थायीभाव
आहे. राज भावनेच्या आधारावर राजकारण मानणार्यांपैकी असून उध्दव प्रश्नांवर
आंदोलन करणार्या नेत्यांमध्ये मोडतात. उध्दवने हिंदुत्वाचा वसा घेतला आहे
तर राजचे राजकारण मराठी अस्मितेवर आधारीत आहे. मुळातच राजकीय मतभेद असलेली
दोन समांतर टोके एकत्र कशी जोडली जातील हा मोठा प्रश्न आहे. निवडणुका जवळ
येऊ लागताच अशाप्रकारच्या युत्या, खेळी, दंगली, आश्वासनांची खैरात,
एकमेकांवर चिखलफेक, भावनिक आंदोलने असे सर्व हातखंडे अवलंबिले जातात.
मनसे-सेना युती झालीच तर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते.
No comments:
Post a Comment