भगवान निळे
मुंबई
हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि संसदेवरील हल्ल्यातील
भारतीय दहशतवादी अफझल गुरू यांना फासावर लटकविल्यानंतर आपण नेमके काय शिकलो
हा प्रश्न उभा राहिला आहे. दुदैवाने हे दोन्ही अतिरेकी पाकिस्तानी असले
तरीही दहशतवादाला कोणत्याही रंगात विभागू नये हा धडा आपण शिकायला हवा.
दहशतवाद हा दहशतवादच असतो.
हिरव्या दहशतवादाचा निषेध आणि भगव्या दहशतवादाचा पुरस्कार करणे अथवा,
भगव्या दहशतवादाचा निषेध आणि हिरव्या दहशतवादाचे समर्थन करणे चुकीचेच
ठरेल. असे दुपट्टी धोरण नेहमीच घातक असते.
जगभरात
दहशतवादावर कुठेही विजय प्राप्त झाला तर तो संपूर्ण मानवजातीचा विजय
समजायला हवा. तसेच, कुठेही अन्याय, अत्याचार झाला तर त्याचा आपण प्रखर
विरोध आणि निषेध केला पाहिजे. दुदैवाने भारताच्या अवतीभोवती शत्रुराष्ट्रेच
अनेक आहेत. पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान, श्रीलंका ही आपली शेजारील
राष्ट्रे भारताच्या विरोधातच आहेत. अमेरिकाही आपल्याकडे सावत्र आईच्याच
भूमिकेतून पहाते. असे असताना आपण आपल्याच देशातील नागरिकांशी मित्रत्वाच्या
भावनेने पहाणे गरजेचे आहे. आपापसातील जात, धर्म, प्रान्त यांना तिलांजली
देऊन ऐकोप्याने नांदायला हवे.
स्वतःच्या
देशात `परकीय’ अथवा निर्वासित जगणे अत्यंत त्रासदायक आणि असुरक्षिततेचे
असते. हा देश आपला नाही. आपल्याला कोणताच देश उरला नाही ही भावना जेव्हा
मनात रूजू लागते. अथवा, तशी परिस्थिती निर्माण केली जाते त्यावेळी माणसाचे
मन बंड करायला धजावते. जोपर्यत `स्व’त्वाचा शाध लागत नाही तोपर्यंत
भीतीच्या अवरणाखाली जगावे लागते. त्यासाठी अल्पसंख्यांक समाजाला मुख्य
प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याची गरज असते.
देशभरातील मुस्लीम अल्पसंख्यांक असो अथवा काश्मिरमधील हिंदू अल्पसंख्यांक
असो, त्यांना सुरक्षितता देऊन त्यांच्यात एकतेची भावना रुजवायला हवी.
आपण
आपापसात एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढू लागलो किंवा एकमेकांच्या
धर्मावर गदा आणू लागलो तर त्याचा लाभ निश्चितच शत्रुराष्ट्रांना होतो. आपण
एकमेकांच्या विरोधात उभे राहून त्यांच्या हातात कोलीत देत असतो. दंगलीला
दंगलीने, हिंसाचाराला हिंसाचाराने उत्तर दिल्याने प्रश्न सुटत नाहीत. उलट
प्रतिक्रियेला प्रतिसादाने उत्तर द्यायला हवे. आपल्या देशांत अंतर्गत कलह
माजून सदैव अशांतता नांदावी असा शत्रूराष्ट्रांचा मनसुबा असतो.ज्याज्यावेळी
आपल्या देशात अशाप्रकारचे एकोप्याचे प्रयत्न झाले आहेत त्या त्यावेळी
परकीय अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत. आपल्या राष्ट्रात सदैव अशांततेचे
वातावरण रहावे व त्यायोगे कुरापती काढण्याची संधी मिळावी, असेच
शत्रुराष्ट्रांना हवे असते.दुदैवाने आपण त्यांना ही संधी वेळोवळी उपलब्ध
करून दिली आहे. बाबरी मशीद प्रकरण, गुजरात दंगल, नांदेड, मालेगाव दंगल,
मुंबईवरील व संसदेवरील हल्ला ही ठळक उदाहरणे आहेत.
अजमल
कसाब आणि अफझल गुरू यांना याचवेळी का फासावर लटकविण्यात आले, हाही
संशोधनाचा विषय आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाने नेमकी ही वेळ का साधली
याचा मागोवा घेतला तर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका’ असे साधे उत्तर
हाती सापडते. सत्तेत आल्यानंतर चार वर्षे कोणतेही समाजपयोगी निर्णय घ्यायचे
नाहीत, उलट प्रश्नांची सोडवणूक न करता प्रश्न निर्माण करायचे अथवा भिजत
ठेवायचे आणि राजवटच्या शेवटच्या वर्षात आपणच निर्माण केलेल्या प्रश्नांची
सोडवणूक करून जनतेची सहानुभूती संपादित करायची हे सत्ताधार्यांचे सरळसोट
गणित आहे. कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी कठोर निर्णय न घेता त्या
प्रश्नाला कायद्याच्या कचाटयात अडकल्याचे भासवून सर्वोच्च न्यायलय जोपर्यंत
झापत नाही तोपर्यंत झोपून रहायचे हेच धोरण काँगेसने अवलंबिले आहे. देशात
स्वतःच दंगली घडवून आणून अथवा बेताल वक्तव्ये करून दोन्ही समाजात तेढ
निर्माण होईल, असे दुषित वातावण करून राजकीय पक्ष सत्तेची स्वप्ने पहात
असतात. त्यामुळे देशाचे किती मोठे नुकसान होत आहे याचे त्यांना सोईरसुतक
नसते.
सर्वसामन्य
जनतेचे भ्रष्टाचार, वाढती महागाई, दलित आणि महिलांवरील वाढते अत्याचार,
बेरोजगारी या ज्वलंत प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी एकमेकांविरुध्द बेताल
वक्तव्ये करून, देशात दंगली माजवून अथवा, अतिरेकी हल्ल्याची `गुप्तचर’ आवई
उठवून सतत भीती दाखविण्याचे कसब राजकर्त्यांनी हेरले आहे.
अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांची, दलितांना सवर्णांची आणि महिलांना
पुरूषांची भीती दाखवून आम्हीच तुमचे रक्षणकर्ते आहोत, असा अभास निर्माण
केला जातो.
बाबरी
मशीद, गुजरात दंगल, नांदेड – मालेगावमधील बॉम्बस्फोट आदी घटनानंतरच
मुस्लीम समाज मोठय़ा प्रमाणावर एकवटल्याचे आणि अधिक आक्रमक झाल्याचे दिसून
येते. या घटनानंतरच मुस्लीम समाजात अनेक माथेफिरू गट आणि संघटना तसेच पक्ष
निर्माण झाले आहेत.त्यापूर्वी मुस्लीम समाज सर्वच पक्षात विखुरलेला होता.
परंतु त्यांच्या अस्तित्वावरच जेव्हा गदा आणण्याची परिस्थिती निर्माण झाली
त्यावेळी प्रतिक्रियेला प्रतिक्रियेनेच उत्तर देण्याचे त्यांच्या हातात
उरले. ओवेसी आणि तोगडिया हे एकाच दहशतवादाचे दोन बीभत्स चेहेरे आहेत, हे
जरी आपण अजमल कसाब आणि अफझल गुरू यांच्या फाशीनंतर शिकलो तरी खूप झाले.
No comments:
Post a Comment