महाराष्ट्रात
भीषण दुष्काळाची काळी छाया पसरली असतानाच सोमवारी दिल्लीवरून तमाम मराठी
बांधवांसाठी एक खुष खबर येऊन धडकली. भारतीय चित्रपट सृष्टीला याच वर्षी 100
वर्षे पूर्ण झालेली असतानाच साठाव्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी
चित्रपटांनी बाजू मांडून मराठी बाणा अधोरेखित केला. `धग’चे दिग्दर्शक
शिवाजी लोटन पाटील यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार
जाहीर झाला. `संहिता’
चित्रपटासाठी आरती अंकलीकर-टिकेकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा तर
`धग’चेच संगीतकार शैलेंद्र बर्वे यांची सर्वोत्कृष्ट संगीतकाराच्या
पुरस्कारासाठी निवड झाली. रत्नाकर मतकरी दिग्दर्शित `इन्व्हेसमेंट’ हा 2012
मधील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. उषा जाधव यांची सर्वोत्कृष्ट
अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी तर विक्रम गोखले यांना `अनुमती’ चित्रपटातील
भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. गेल्या वर्षी उमेश
कुलकर्णी दिग्दर्शित `देऊळ’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला
होता तर अभिनेता गिरीष कुलकर्णी याला `देऊळ’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि
सर्वोत्कृष्ट संवाद असे पुरस्कार मिळाले होते. मिलिद बोकील यांच्या
कादंबरीवर आधारीत असलेल्या `शाळा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा
पुरस्कार पटकथाकार अविनाश देशपांडे यांना मिळाला होता. तसेच नितीन
देसाईच्या `बालगंधर्व’ या चित्रपटाला तीन पुरस्काराने गौरवण्यात आले. आनंद
भाटे यांना पार्श्वगायनासाठी, विक्रम गायकवाड यांना रंगभूषेचा पुरस्कार तर
नीता लुल्ला यांना वेशभूषेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. एकूण काय
तर मराठी चित्रपटाला गेल्या काही वर्षापासून आलेली मरगळ दूर झाली असून
पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. बाष्कळ आणि पाणचट मराठी विनोदी चित्रपटांनी
थैमान घातले असतानाच गेल्या काही वर्षापासून नव्या दमाच्या हरहुन्नरी
कलावंतांनी, दिग्दर्शकांनी आणि पटकथाकारांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना
मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणून सोडले आहे. वेगवेगळ्या सामाजिक आणि भावनिक
विषयांची हाताळणी करण्याची जोखीम घेऊन करण्यात आलेले प्रयोग भालजी
पेंढारकर, राजा परांजपे, व्ही. शांताराम, जब्बार पटेल यांचे युग पुन्हा
अवतरण्याचे द्योतक आहे. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात मराठी चित्रपटांनी
मारलेली बाजी कोणत्याही मराठी माणसाची छाती फुगविण्यास पुरेशी आहे. मराठीचा
डंका असाच त्रिलोकी वाजायला हवा. हे जरी खरे असले तरी पुरस्कारप्राप्त
अभिजात दर्जाचे हे चित्रपट किती मराठी माणसांनी पाहिले आहेत हा संशोधनाचा
विषय आहे. यापूर्वी पुरस्कार मिळालेले `देऊळ’, `बालगंधर्व’, `शाळा’ हे
चित्रपट तरी चित्रपटगृहात चालले आणि किती मराठी माणसांनी पाहेले आहेत?
`धग’, `संहिता’, `इन्व्हेसमेंट’, `कातळ’ या यावर्षीच्या चित्रपटांची नावे
तरी मराठी माणसांना ठाऊक होती का? चित्रपट समीक्षकांखेरीज किती सर्वसामान्य
प्रेक्षकांनी हे चित्रपट पाहेले आहेत, हा प्रश्न निर्माण होतो. मराठी
चित्रपटांची अनेक दुखणी आहेत. त्यांना मोक्याची चित्रपटगृहे मिळत नाहीत,
आधुनिक तंत्रज्ञानातही मराठी चित्रपट उणा पडतो. विषयांची कमतरता नसतानाही
संवेदनशील, राजकीय अथवा वादग्रस्त विषय हाताळण्याचा धोका पत्करण्यास कुणी
निर्माता आणि मराठी दिग्दर्शक पुढे येत नाही. विषय चांगला असेल तर
निमिर्तीसाठी करोडो रूपये उधळणेच आवश्यक आहे असेही नाही. मराठी प्रेक्षक
आता बराच सुज्ञान झाला आहे. त्याच त्याच तमाशापटाला आणि तकलादू तथाकथीत
विनोदीपटाला तो पुरता उबगला आहे. सरकारी अनुदानाच्या प्रतीक्षेत रांगेत उभे
राहून हा प्रश्न सुटणारा नाही. मराठीत नव्या दमाचे, कसलेले, कलावंत,
हरहुन्नरी दिग्दर्शक, आधुनिक ज्ञान संपादन केलेले तंत्रज्ञ आहेत. हिंदीकडे
वळलेला मोठय़ा प्रमाणावरील सुजाण मराठी प्रेक्षकही आहे. या प्रेक्षकाला
आपल्याकडे खेचून आणण्याची धमक मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांकडे हवी.
महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्यात मराठी चित्रपटांची चाललेली वाताहात
थोपविण्यासाठी आत्मचिंतनाची गरज आहे. तामीळ, कन्नड चित्रपटसृष्टीप्रमाणे
मराठी चित्रपटसृष्टी फोफावायला हवी. चांगले चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक
चित्रपटगृहांकडे वळत नसेल तर चित्रपट त्यांच्याकडे घेऊन जायला हवा.
खेडय़ापाडय़ातून त्याचे प्रदर्शन व्हायला हवे. आधुनिक युग हे जाहिरातीचे
युग आहे. स्वतःची जाहिरात करणाराच येथे प्रसिध्दीस पावतो. हा धडा घेऊन
मराठी चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाचा प्रचार आणि प्रसार करायला
हवा. `श्वास’च्या निर्मात्यांनी ही किमया करून दाखविली होती. `श्वास’च्या
जाहिरातीची, प्रमोशनची री अन्य निर्मात्यांनी ओढली तर मराठी
निर्माते-दिग्दर्शक प्रत्येक वर्षाच्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात
अशाचप्रकारे प्रत्येक वर्षी मराठीचा झेंडा उंचावतील यात शंका नाही. मराठीत
कलावंताच्या खाणीचा सुकाळ आहे. त्यामुळे मराठी चित्रपट महाराष्ट्राच्या
सीमा उल्लंघून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला मराठमोळा ठसा उमटवील, अशी आशा
बाळगायला काहीही हरकत नाही.
No comments:
Post a Comment