सत्तेच्या
लोभापाई एकमेकांची कॉलर पकडण्याची किंबहुना, एकमेकांच्या अंतर्वस्त्राला
हात घालून नागडे करण्याची राजकारणी मंडळींची प्रवृत्ती हिंदी
चित्रपटसृष्टीतही बोकाळू लागली असून या जीवघेण्या स्पर्धेत `ज्याच्या हाती
काठी त्याचीच म्हैस’ या न्यायाने बलाढय़ कंपनीची सरशी होऊ लागली आहे.
अधिकाधिक चित्रपटगृहे मिळवून खोर्याने पैसा ओढण्याचा एककलमी कार्यक्रम
सध्या बॉलिवूडमध्ये सुरू झाला आहे. पूर्वी चित्रपट किती आठवडे चालला? हा
निकष लावण्यात येत होता. त्यावरून निर्माते- दिग्दर्शक आणि कलावंतांची
कसोटी लागायची. रौप्य, सुवर्ण अथवा हीरक महोत्सव साजरा करणारे चित्रपट
रसिकांच्या मनावर साम्राज्य प्रस्थापित करून चित्रपटांच्या इतिहासात आपले
नाव नोंदवायचे. चित्रपटांचा दर्जा किती आठवडे चालला यावर ठरविला जायचा. आता
मात्र पहिल्या आठवडय़ात एखाद्या चित्रपटाने किती कोटीचा गल्ला जमा केला या
मोजपट्टीवर चित्रपटाचा दर्जा ठरविला जातो. कितीही बिग बजेट , मल्टीस्टारर
चित्रपट असला तरी त्याने पहिल्या आठवडय़ात जमा केलेल्या गल्ल्यावरच त्याचे
यश ठरविले जाते. त्यामुळेच `एक था टायगर’सारखा भिकार चित्रपटही प्रमोशन आणि
सलमान खानच्या नावावर `बिग हिट’ म्हणून खपवून घेतला जातो. मात्र,
चित्रपटगृहे न मिळाल्यामुळे `शूद्र’ नावाचा कलात्मक आणि विचारप्रवर्तक
चित्रपटही नांगी टाकतो. करोडो रुपयांच्या हिंदी चित्रपटाचे भवितव्य
प्रत्येक शुक्रवारी ठरत असते. त्यामुळे पहिल्याच आठवडय़ात देशभरातील
अधिकाधिक मल्टीप्लेक्सेस आणि सिंगल चित्रपटगृहात आपला चित्रपट झळकवून
पहिल्या एक-दोन दिवसातच संपूर्ण चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च वसूल
करण्यावर निर्मात्यांचा डोळा असतो. चित्रपट पूर्ण करण्याची पहिली लढाई
जिंकल्यानंतर सर्वाधिक चित्रपटगृहे काबीज करण्याची मोठी लढाई जिंकण्यात
यशस्वी होणारा निर्माता खोर्याने पैसे ओढू शकतो हेच हिंदी चित्रपटसृष्टीचे
नवे अर्थकारण बनले आहे. या अर्थकारणातूनच स्पर्धा आणि शह-काटशाहाचे राजकारण
जन्माला आले आहे. याचे हिणकस आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे, `जब तक है जान’
आणि `सन ऑफ सरदार’ यांच्यातील लढाई. रोमान्सचा बादशहा शाहरूख खान आणि
ऍक्शन हिरो अजय देवगण अभिनीत या दोन चित्रपटांच्या प्रदर्शनावरून हिंदी
चित्रपटसृष्टीतील `आहे रे’ आणि `नाही रे’ या दोन वर्गाचा अर्थसंघर्ष पुढे
आला आहे. या लढाईत अपेक्षेप्रमाणे बलाढय़ `यशराज फिल्मर्स’चा विजय झाला
आहे. सणाच्या मोसमात आणि विशेषतः दिवाळीत आपला चित्रपट प्रदर्शित करून जादा
कमाई करण्यावरच निर्मात्यांचा डोळा असतो. 13 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी
हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे त्यांच्यात चढाओढ लागली आहे.
या तारखेवरून `जान’चे निर्माते यश चोप्रा आणि `सरदार’चे अजय देवगण यांच्यात
मतभेद निर्माण झाले होते. यशजी हयात असतानाच अजय देवगणने त्यांना नोटीस
धाडली होती. अजयने सगळ्यात आधी 13 नोव्हेंबर ही तारीख बुक करून ठेवली होती.
परंतु `यशराज’च्या मक्तेदारी आणि दादागिरीमुळे त्याच्या वाटय़ाला 1800पैकी
अवघी 600 सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे आली. वैतागलेल्या अजयने न्यायालयात
धाव घेताच न्यायालयाने `कॉम्पिटीशन कमिशनर ऑफ इंडिया’ (सीसीआय) च्या
कोर्टात चेंडू टाकला. सीसीआयने अजयचा दावा फेटाळून बलाढय़ यशराजपुढे नांगी
टाकली. अजय देवगण प्रॉडक्शनने आधीच राखीव केलेल्या देशभरातील 1800 सिंगल
स्क्रीनपैकी केवळ 600 स्क्रीनवर त्याची बोळवण करण्यात आली. आपल्यावर
झालेल्या अन्यायाविरूध्द अजयने दंड थोपटताच त्याला खलनायक बनवून टाकण्यात
आले. पैशाच्या जोरावर काहाही करणे अशक्य नाही हे यामुळे पुन्हा एकदा
अधोरेखित झाले आहे. मल्टिप्लेक्स न मिळाल्यामुळे अजयला आता केवळ 600
चित्रपटगृहांमध्येच चित्रपट प्रदर्शित करावा लागेल किंवा तारीख बदलून
चित्रपटाचे प्रदर्शन लांबवावे लागेल. या दोन्ही निर्णयात त्याला तोटा मात्र
सहन करावा लागेल. यशराजसारख्या बडय़ा कंपनीशी पंगा न घेता नांगी टाकली
तरीही तारीख पुढे ढकलल्यास त्याला आमीर खानचा `तलाश’, सलमानचा `दबंग 2′,
मल्टिस्टारर `धूम3′, अक्षयचा `खिलाडी 786′, महेश भट्टचा `मर्डर 3′,
धर्मेंद्रचा `यमला पगला दिवाना’, हृतिक रोशनचा `क्रिश 2′ या चित्रपटांशी
सामना करावा लागेल. यश चोप्रा यांचा अखेरचा चित्रपट, भावनात्मक प्रेमकथा,
शाहरूख-कतरिना कैफ या जोडीचाही पहिला चित्रपट आणि बिग बॅनर्स या `जब तक है
जान’च्या जमेच्या बाजू असून मसाला चित्रपट असलेला अजयचा `सन ऑफ सरदार’
बॉक्स ऑफिसवर अटीतटीची लढत देऊ शकत नाही, हे खरे असले तरी स्पर्धा निकोप
आणि कायद्याच्या चौकटीत राहून व्हायला हवी. मोठे नाव, प्रतिष्ठा, दबदबा आणि
गुर्मीच्या जोरावर कायदे बासनात गुंडाळून शिरजोरी करणे कधीही अयोग्यच
असते. या लढतीत `जब तक है जान’ जिंकला असला तरी `सन ऑफ सरदार’ हरलेला
नाही हेही तितकेच खरे. दोन्ही चित्रपट एकत्रच प्रदर्शित होत असल्यामुळे
त्याचा तोटा दोघांनाही सहन करावा लागणार आहे. बलाढय़ हत्तीप्रमाणे उंदीर
गोणी उचलू शकणार नसला तरी तो गोणी कुरतडून टाकू शकतो याचे भान ठेवायला हवे.
शेवटी काय तर, विजय नेहमी सत्याचाच होत असतो असे नाही तर अनेकदा असत्यच
सत्याचा वेष पांघरून खुलेआम हिंडू लागते, हे सत्य पुन्हा एकदा शाहरूख खान –
अजय देवगणच्या लढाईतून पुढे आले आहे.
No comments:
Post a Comment