Friday, June 28, 2013

खरे नक्षलवादी कोण?


नक्षलवादी कारवायांमध्ये गुंतल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने फरार घोषित केलेले `कबीर कला मंचा’चे कार्यकर्ते शीतल साठे आणि सचिन माळी यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी सत्याग्रह करीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. `नक्षलवादी’ म्हटले म्हणजे अतिरेकी, दहशतवादी, समाजकंटक असा समज शासन यंत्रणा, बडे भांडवलदार आणि जमिनदारांनी करून ठेवला आहे. चित्रपट आणि प्रसारमाध्यमातूनही नक्षलवादी कार्यकर्त्यांचे चित्रण असेच लालभडक करण्यात येते आहे. त्यामुळे नक्षलवादी हे अतिरेकीच आहेत असा सर्वसामान्य नागरिकांचा गोड गैरसमज झालेला आहे. ब्रिटीशांच्या दडपशाहीविरूध्द लढणार्या भगतसिंगसारख्या क्रांतीकारकाला बंडखोर, दहशतवादी ठरवून फासावर लटकविण्यात आहे होते. साम्यवादी विचारसरणी असलेला भगतसिंग भारतीय स्वातंत्र्य लढय़ात प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याच भगतसिंगाच्या पावलावर पाऊल ठेवून `कृष्णवर्णिय ब्रिटिशां’ंशी लढा देणार्यांना मात्र `नक्षलवादी’ ठरवून तुरूंगात डांबण्यात येत आहे. साम्यवादी विचारसरणीचा वसा घेतलेली ही मंडळी कार्ल मार्क्स, लेनिन, माओ त्से तुंग आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगतात. गोरगरीब, आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक, भटके – विमुक्त यांच्या न्याय्य लढय़ासाठी प्रसंगी हिंसक आंदोलन करणार्या या चळवळीला सत्ताधारी आणि भांडवलदार यांच्याकडून नेहमीच बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रस्थापित समाजव्यवस्थेला विरोध करून शेतमजूर, कष्टकरी समाज आणि कामगारांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाच्या या लढाईत विविध समाजातील, वर्गातील तरुण मोठय़ा संख्येने या चळवळीकडे ओढला जाऊ लागला आहे. त्यामुळेच भांडवलदारी समाजव्यवस्थेचे रक्षण करणार्यांचे धाबे दणाणले आहे. या चळवळीत झोकून देणारे उच्चशिक्षित असून शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, कलावंत, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील तरुण या चळवळीकडे आकृष्ट झाला आहे. आपल्या करिअरवर, संसारावर तुळशीपत्र ठेवून हा तरुण (ज्यात महिलांचा समावेश अधिक आहे) का ओढला जात आहे यांचा विवेकपूर्ण विचार व्हायला हवा. नक्षलवाद्यांच्या नावाखाली अनेक निरापराध तरुणांना कित्येक वर्षे तुरूंगात डांबले जात असून पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची मुक्तता केली तरी त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात पुन्हा पुन्हा अटक करून तुरूंगात डांबले जात आहेत. दहा – दहा वर्षानंतर या तरुणांविरूध्द कोणताही आरोप सिध्द न झाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येते. परंतु त्यांनी तुरूंगात नाहक व्यतित केलेल्या अर्ध्या आयुष्याचे काय? स्वतः गुन्हा केला नसताना केवळ विशिष्ट विचार-प्रवाहाचे आकर्षण वाटल्यास व्यक्ती गुन्हेगार ठरत नाही, असे न्यायालयाने अनेकवेळा स्पष्ट करूनही केवळ घरामध्ये `लाल’ साहित्य सापडले म्हणून अनेक तरुणतरुणींना संशयित म्हणून तुरूंगात डांबण्यात येत आहे. जनतेत जनजागृतीसाठी पथनाटय़े, जलसा करणार्या कार्यकर्त्यांनाही `नक्षलवादी’ ठरविण्यात येते. फुले-आंबेडकर, मार्क्स-लेनिन-माओ यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे हा आपल्या देशात गुन्हा मानला जाऊ लागला आहे की काय अशी रास्त शंका येऊ लागली आहे. हिंसेचे समर्थन कुणीही करणार नाही. मात्र हिंसा म्हणजे नेमके काय? याचा पुन्हा एकदा सारासार विचार व्हायला हवा. जीव वाचविण्यासाठी केलेली चिरफाड आणि जीव घेण्यासाठी केलेली चिरफाड यात फरक आहे. चाकू-सुरे सारखेच असले तरी त्यामागे हात कुणाचे आहेत हे तपासायला हवे. राष्ट्रविरोधी कारवाया आणि सामान्य गोरगरीबांच्यासाठीचा लढा यात मोठे अंतर आहे. अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून परदेशात पैसा लपवून ठेवणारे धनदांडगे, कष्टकर्यांच्या श्रमाचा मोबदला न देता त्यांची पिळवणूक करणारे भांडवलदार, धर्माच्या नावाखाली जातीय दंगे घडवून आणणारे धर्ममार्तंड, लाखो टन धान्य कुजत ठेवून कुपोषित बालकांच्या तोंडचा घास हिरावणारे पुढारी, सरेआम महिलांच्या इभ्रतीचा गळा घोटणारे बलात्कारी, जातीयता पाळणारे बुरसट विचारांचे धर्माचे ठेकेदार, नाटक, चित्रपट, प्रसारमाध्यमे यातून अंधश्रद्धा जोपासणारे कलेचे ठेकेदार, शिक्षणाचा बाजार मांडणारे शिक्षणसम्राट, जनतेच्या अज्ञानाचा आणि सहनशिलतेचा अंत पाहणारे तथाकथित सत्ताधार, दंडुक्याचा वापर करून निरापराध्यांना यमसदनाला धाडणारे अहिंसेचे पुजारी पोलीस हे कोण आहेत? कबीर कला मंच हा सामाजिक न्यायाच्या उद्देशाने कार्यरत असलेला पुण्यातील सांस्कृतिक गट आहे. अशाप्रकारचे अनेकगट महाराष्ट्रात आहेत. ही एक सांस्कृतिक चळवळ आहे. त्यांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यांनी काम केलेल्या ‘जयभीम कॉम्रेडस’ या डॉक्युमेंटरीला राष्ट्रीय व राज्य पुरस्कार द्यायचा आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबायचे हा कुठला न्याय? अटक केलेल्या कार्यकर्त्यांवर एकही आरोप सिध्द होणार नाही हे पोलिसांनाही माहित आहे. केवळ त्यांचा लढा मोडीत काढण्याचा हा प्रयत्न आहे. `क्रांती’ बंदुकीच्या नळीतून जन्माला येते ‘ या माओच्या उक्तीचा जगाप्रमाणेच आपणही धसका घेतला आहे. परंतु दडपशाहीवर जोपासलेली समाजव्यवस्था दडपशाहीचा धाक असेपर्यंतच टिकते, हा धाक संपल्यावर काय? सर्वसामान्यांचे राज्य कधीना कधी येणारच. त्यांना बंदुकीची नळकांडी अथवा तुरूंगाच्या भिंती थोपवून धरू शकत नाहीत.

No comments:

Post a Comment