Friday, June 28, 2013

सोळावं वरीस धोक्याचं?


दिल्लीतील पाशवी बलात्कारानंतर महिलांवरील लैंगिक शाषणाच्यासंदर्भात नव्याने विचार सुरू झाला आहे. परस्पर संमतीने शरिरसंबंध ठेवण्याची वयोमर्यादा 18 वरून 16 वर आणतानाच फैजदारी कायद्यात पुन्हा बलात्कार हा शब्द सामाविष्ट करण्यात येणार आहे. संसदेच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणारा फौजदारी कायदा दुरूस्ती विधेयकाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. विद्यमान कायद्यात `बलात्कार’ या शब्दाऐवजी `लैंगिक हल्ला’ किंवा `अत्याचार’ असा शब्द असणार आहे. परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवण्याची वयोमर्यादा 16 वर आणल्यामुळे स्वैराचाराला रान मोकळे होईल, असा टाहो संस्कृतीरक्षकांनी फोडला आहे. विवाहचे वय मुलींसाठी 18 आणि मुलांसाठी 21 असले तरी कुणी या वयात विवाह करीत नाहीत. स्वतःचे करिअर आणि शिक्षणालाच मुले – मुली प्राधान्य देतात. तसेच वयाचा निकष 16 ठरविल्यानंतर कुणी लगोलग मोठय़ा प्रमाणावर शीररसंबंध ठेवायला सुरूवात करतील असे नाही. निसर्गानेच 16 वर्षाची मुलगी शारिरीकदृष्टय़ा `बाई’ होते असे ठरवून दिलेले आहे. सोळावं वरीस धोक्याचं असे म्हणतात ते यामुळेच. निसर्गाने सृष्टीची रचना जाणीवपूर्वक केलेली आहे. आम्ही मात्र त्यात ढवळाढवळ करून निसर्ग नियमांच्याविरोधात स्वतःचे नियम लादले आहेत. लैंगिक विषयांवर उघड चर्चा करणे, प्रश्न विचारणे हे भारतीय समाजात निषिद्ध मानले जाते. तशी शिकवण आपल्याला बालवयापसूनच दिली जाते. पौगंडावस्थेत मुला-मुलींच्या मनात लैंगिकतेविषयी नैसर्गिकरीत्या अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांना पडलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी मात्र कोणीही नसते. एखाद्या गोष्टी विषयीचे अज्ञान हे ती गोष्टी करण्यास मुलांना प्रवृत्त करत असते. त्यामुळे लैंगिकतेविषयी एक प्रकारची उत्सुकता पौगंडावस्थेत मुला-मुलींच्या मनात निर्माण होते आणि मग पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी धडपड सुरू होते. लैंगिकतेबाबतच्या मिळणार्या अर्धवट ज्ञानाने काही गैरसमजुती आणि न्यूनगंडांना ही मुलं-मुली बळी पडतात.लैंगिक संबंधांत चोरटेपणा आणि अपराधीपणा आहे, ही कोंडी फोडून यात जितक्या लवकर मोकळेपणा येईल तेवढाच वाढत्या विकृतीला आळा घालता येईल. मुला-मुलींचा लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप व्हावा. वयात येणार्या मुलांच्या मनात लैंगिक भावनांचा अन् प्रश्नांचा कल्लोळ असतो; पण मुलांनी आपल्या पालकांना याबाबत काही विचारावे अशी सोय नाही आणि पालकांनी लैंगिक विषयावर मुलांशी बोलावे एवढे त्यांच्याकडे संस्कृती आणि धर्मामुळे धाडस नसते. निसर्गनियमाप्रमाणे जाग्या झालेल्या त्यांच्या लैंगिकतेला माध्यमे, इंटरनेट, जागतिकीकरण यांच्या रेटय़ामुळे अवेळी आणि प्रमाणाबाहेर खतपाणी घातले जाते. चांगले-वाईट, चूक बरोबर,यांमधल्या सीमारेषा पुसट होत आहेत, या सगळ्या ओढाताणीत किशोरवयीन मुले-मुली गोंधळून जात आहेत. कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. आपण कितीही नाकारले तरी आपल्या आजूबाजूची परिस्थिती चांगल्या वाईट प्रकारे बदलत राहणार आहे. विवाहपूर्व शरीरसंबंध, व्यसनाधीनता, घटस्फोट यांचा धोका वाढतोय हे स्वीकारायला समाजातल्या काही घटकांची तयारीच नाही. बलात्कार ही एक विकृतीच आहे. ती लैंगिक भावनांची कोंडी केल्याने उफाळून येते. पुरुषच बलात्कार करतात हे तरी खरे आहे का? स्त्रियांनी केलेल्या बलात्कारांची चर्चा होत नाही. मुळात समाज तो प्रकार असू शकेल असेही मान्य करीत नाही. पण म्हणून तसे घडतच नाही असे समजणे हे आपली समज आणि जाण किती कच्ची आहे तेच दाखवून देते. कामवासना ही काही बाहेरून येणारी गोष्ट नाही किंवा ती अमुक ठिकाणी, अमुक वेळी उद्दीपित होईल याचे काही गणितही नाही. कामवासना ही जीवाच्या अस्तित्वाला वेढून असलेली किंबहुना त्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. ही गरज पूर्ण करण्याची सुरक्षित, सन्मानजनक, न्याय्य पद्धतही माणसाने मानवी सभ्यतेच्या विकासप्रक्रियेत विकसित केली आहे. मात्र बलात्कार होतो त्यावेळी केवळ कामवासनेची पूर्ती हा एकच उद्देश असत नाही. खरे तर त्यापाठची मानसिकता ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. निराशा, उद्वेग, बदल्याची भावना, सूड, वैफल्य, कोंडी, संताप या अणि अशा गोष्टीही त्यात प्रामुख्याने असतात. स्त्रीचा उपभोग घेणे म्हणजे आपले वर्चस्व सिद्ध करणे असा विचारही त्यात असतो. पुरुष स्त्रीचा उपभोग घेउन स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहतो आणि तिची कोंडी करू पाहतो. परंपरा आणि सामाजिक बंधने यांना शरण गेलेला समाज स्वतःवर अनेक सवयी आणि बंधने लादून घेत असतो. सामाजिक स्वस्थ्याच्या नावाखाली लैंगिक भावनेला पाप समजून त्यांची कोंडी करणे संयुक्तिक ठरत नाही.उलट त्याचा उद्रेक होऊन त्याचे वाईट परिणाम समोर येतात. तसेच, शिक्षा वाढवून गुन्हे कमी होत नाहीत हे दिल्लीच्या घटनेनंतर देशभर बलात्कारांच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीतून स्पष्ट होते. बलात्कार करणार्या पुरूषांमध्ये 16 ते 21 वयाच्या तरूणांचा सहभाग अत्यल्प आहे. ज्यांनी संभोगाचा अनुभव घेतलेला आहे अशीच माणसे बलात्काराच्या घटनेतील आरोपी असतात. ज्या कुटुंबात, समाजात मोकळे, खुले वातावरण असते त्या कुटुंबात आणि समाजात बलात्काराचे प्रमाण नगण्य असते. परंतु जो धर्म, पंथ शरिरसंबंधाबाबत मागासलेला असतो, शरिरसंबंधावर धर्माच्या, देवाच्या, पाप-पुण्याच्या नावाखाली बंधने घालतो त्याच समाजातील, धर्मातील माणसे मोठय़ा प्रमाणावर लैंगिक अत्याचारात आघाडीवर असतात. त्यामुळे वय कमी -जास्त करून काहीही फरक पडणार नाही. शास्त्रीय लैंगिक शिक्षण आणि धर्माच्या जोखडाखाली लादली जाणारी लैंगिक कोंडी जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत बलात्काराला आळा बसणार नाही.
Tags:  लेख

No comments:

Post a Comment