हिंदी
चित्रपटसृष्टी, म्हणजे, आताचे बॉलीवूड हे जगावेगळे एक नवे जग आहे. स्वप्ने
वाटण्याच्या या इंडस्ट्रीने गेली शंभर वर्षे चाहत्यांचे मनोरंजन करून
त्यांना रिझविले आहे. धकाधकीच्या जीवनात, जगण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत
घटकाभर दुःख विसरण्याचे टॉनिक पुरविणार्या चित्रपटसृष्टीने गल्लाभरू
मनोरंजन करून स्वतःचे सामाज्य निर्माण केले आहे.
सोन्याची खाण बनलेल्या या इंडस्ट्रीत आठवडय़ाभरात 100 कोटींची `माया’ जमा
होते हे तोंडात बोट घालायला भाग पाडणारे सत्य आहे. या झगमगत्या बेगडी
दुनियेचा विद्रुप चेहरा मात्र सिने रसिकांसमोर येत नाही.
पार्श्वगायक
महंमद रफीसोबत ज्याने `वतन की राह में, वतन के नौजवान शहीद हो’ हे
लोकप्रिय गाणे गायले त्या खान मस्ताना नावाच्या पार्श्वगायकाला भीक मागता
मागता हाजीअलीच्या दर्ग्यातच शेवटचा श्वास घ्यावा लागला. तर बी. आर.
चोपडाच्या `हमराज’ या चित्रपटातील नायिका विमी हिला हमराज, पतंगा, वतन,
आबरू या चित्रपटानंतर काम मिळणे बंद झाल्याने वेश्याव्यवसाय पत्करावा
लागला. तिने शिव अगरवाल नावाच्या उद्योगपतीशी विवाह केला होता.
घटस्फोटानंतर ती जॉली नावाच्या निर्मात्यासोबतही राहात होती. असे असताना
ती जेव्हा रूग्णालयात मरण पावली त्यावेळी तिचे प्रेत घेण्यास कुणीही पुढे
आले नाही. बेवारस म्हणून तिच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.
तत्पूर्वी, आघाडीची नृत्यांगना आणि जिने हिंदी चित्रपटसृष्टीत खर्या
अर्थाने `कॅबे डान्स’च्या युगाचा प्रारंभ केला त्या कुक्कु नावाच्या
अभिनेत्रीचाही दुखान्त झाला. 1946 साली `अदब का सितारा’ या चित्रपटाद्वारे
पदार्पण केलेल्या कुक्कुने अंदाज, बरसात, आरजू, हलचल, आवारा, आन, मि.
एन्ड मिसेस 55, चलती का नाम गाडी, यहुदी, मुझे जीने दो या चित्रपटांतून
भूमिका साकारल्या. ती मरण पावली त्यावेळी कफल्लक अवस्थेत, एकाकी आणि निर्धन
होती. व्ही. शांताराम यांच्या `अमृत मंथन’ या चित्रपटाने एका रात्रीत
स्टार बनविलेले अभिनेते चंद्र मोहन हे निधन पावले त्यावेळी त्यांचे
अंन्तसंस्कार करण्यापुरतेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. अभिनेते मोतीलाल
यांनी त्यांच्यावर अन्त्यसंस्कार केले. पुकार, हुमायून, शहीद, रोटी या
चित्रपटांतून प्रसिध्द पावलेल्या चंद्रमोहन यांनी सोहराब मोदी, मेहबूब खान,
रमेश सेहेगल या दिग्गज दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केले होते. `व्हॅट
69′ पिणार्या या अभिनेत्याला शेवटी गुत्त्यातली दारू ढोसावी लागली. यातच
वयाच्या अवघ्या 43व्या वर्षी ते निधन पावले.
1926
साली केवळ 17 दिवसांत `टायपिस्ट गर्ल’ नावाचा हिट चित्रपट दिग्दर्शित
करणारे, बहुचर्चित रणजित स्टुडिओचे मालक चंदुलाल शाह 25 नोव्हेंबर 1975
रोजी मरण पावले त्यावेळी ते कफल्लक होते. ज्याच्याकडे स्वतःच्या गाडय़ांचा
मोठा ताफा होता, त्यांना बसमधून प्रवास करावा लागला. के. एल. सेहेगल आणि
मोतीलाल यांच्यासारख्या दिग्गजांनी ज्यांच्याकडे नोकरी केली ते चंदुलाल शाह
यांनी 34 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तसेच 141 चित्रपटांची निमिर्ती
केली.फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे ते पहिले अध्यक्ष होते.
निर्माते
सोहराब मोदी यांचे `फाईंड’ असलेले आणि महंमद रफी ज्यांच्या आवाजाची, गायन
शैली आणि लकबीची कॉपी करायचे त्या पार्श्वगायक गुलाम एम. दुराणी यांना
मुंबईच्या पदपथावर भीक मागत असतानाच मृत्यू आला. `गांव की गोरी’ या
चित्रपटात 1944 साली महंमद रफीने पहिल्यांना पार्श्वगायन केले तेसुध्दा
दुराणी आणि कोरसच्या सोबतच. गुलाम महंमद, एस. डी. बर्मन, सज्जाद, नौशाद
यांच्यासारख्या बडय़ा संगीतकारांसोबत दुराणी यांनी काम केले होते. उतारवयात
पोट भरण्यासाठी या महान गायकाला बालगीते आणि `जिंगल्स’ गावे लागले. याला
नियतीचा खेळ म्हणायचे का ?
प्रदीपकुमार
या महान अभिनेत्याला नातेवाईकांनी कोलकात्याच्या नर्सिंग होममध्ये अक्षरशः
फेकून दिले होते. 1952 साली प्रदर्शित झालेल्या `आनंदमठ’ या चित्रपटापासून
कारर्कीद सुरू करणार्या प्रदीपकुमार यांनी बीना रॉयसोबत `अनारकली’,
वैजयंतीमाला सोबत `नागीन’ तसेच, बंधन, चित्रलेखा, बहुबेगम, मेरी सुरत तेरी
आँखे, मेहबूब की मेहंदी, रझिया सुलतान आदी असंख्य चित्रपटांतून प्रमुख आणि
चरित्र्य अभिनेत्याच्या भूमिका केल्या. त्यांची कन्या `उतरन’ या मालिकेतील
अभिनेत्री बीना बॅनर्जी 141 चित्रपटांतून चमकलेली असतानाही प्रदीपकुमार
यांना शेवटचे आयुष्य एकटय़ाने नर्सिंग होममध्ये व्यतीत करावे लागले.
अम्बा
लक्ष्मणराव शागून ऊर्फ ललिता पवार यांना मराठी व हिंदी चित्ररसिक कधीच
विसणार नाहीत. 700हून अधिक चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणार्या
ललिताबाई दगावल्याची माहिती संपूर्ण जगाला चार दिवसानंतर कळाली. 1928
साली दादासाहेब फाळके यांनी निर्माण केलेल्या `राजा हरिश्चंद्र’ या
भारतातील पहिल्या चित्रपटात वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ललिता पवार यांनी
काम केले. 1942 साली चित्रीकरणाच्या वेळी नवखे कलाकार मा. भगवान त्यांच्या
कानशिलात लगावतात असे दृष्य होते. मा. भगवान यांनी मात्र खरोखरीच
त्यांच्या कानशिलात जोरदार लगावली. चुकून जोरदार फटका बसल्याने त्यांच्या
डाव्या डोळ्याची नस तुटली आणि त्यांचा डोळा कायमचा अधू झाला. त्या अधू
डोळ्याचाच याग्य वापर करून त्यांनी अजरामर अशी खाष्ट सासू हिंदी
चित्रपटसृष्टीला दिली. त्याच ललिता पवार यांना अखेर कुणाचीही साथ मिळाली
नाही. एकाकी आयुष्य जगत असताना त्यांचे प्रेत तब्बल चार दिवस अग्नीची वाट
पहात पुण्यातील घरात पडून होते.
भगवान
आबाजी पालव ऊर्फ भगवानदादा उर्फ मा. भगवान या गिरणी कामगाराच्या मुलाने
हिंदी चित्रपटसृष्टी गाजविली. चाळीत राहणर्या या मुलाने स्वतःची जागृती
पिश्चर्स ही संस्था काढून चेंबूरला जागृती स्टुडिओ विकत घेतला.त्याच
भगवानदादाला अखेरचा श्वास दादरच्या चाळीत छोटेखानी खोलीतच घ्यायला लागला.
गीताबालीला घेऊन त्यांनी तयार केलेला `अलबेला’ हा चित्रपट माईलस्टोन ठरला.
समुद्राच्या किनारी 25 खोल्यांचा भव्यदिव्य बंगला आणि इर्म्पोटेड गाडय़ांचा
ताफा असलेल्या भगवानला `घमेला’ आणि `लाबेला’ या चित्रपटांनी कर्जदार
बनविल्यानंतर घोडय़ाच्या शर्यतीचे व्यसन, ऐशोआरामात राहण्याची जडलेली सवय
आणि सख्ख्या भावांनी लुटलेली संपत्ती यामुळे पुन्हा चाळीत राहूनच जगाचा
निरोप घ्यावा लागला.
प्रख्यात
चरित्र अभिनेते ए. के. हंगल यांनाही गरीबीत आयुष्य कंठावे लागले.
वृध्दापकाळात त्यांच्या आजाराचा खर्च भागविण्यासाठी त्यांना
सार्वजनिकरीत्या मदतीचे आवाहन करावे लागले.
कर्ज,
अर्थ, तेरी मेहरबानिया आदी 24 हिंदी चित्रपटात भूमिका केलेला राजकिरण या
अभिनेत्या-लाही विजनवासात आपले आयुष्य घालवावे लागले. गेले अनेक वर्षे
राजकिरण चित्रपटसृष्टीतून गायब झाले होते. अभिनेता ऋषिकपूरला काही
वर्षापूर्वी ते अमेरिकेतील ऍटलान्टा येथील एका आश्रमात आढळले होते. त्यांची
मानसिक स्थिती बिघडली होती. अशा या इंडस्ट्रीत त्यामुळेच ज्येष्ठ
अभिनेत्री शांता हुबळीकर यांना वृध्दाश्रमात आयुष्य घालवावे लागले. ज्या
`माणूस’ चित्रपटाने इतिहास घडविला त्या चित्रपटांतील नायिकेला
वृध्दाश्रमाशिवाय पर्याय उरला नव्हता. मा. परशुराम या अभिनेत्याला तर
रस्त्यावर भीक मागावी लागली. मीनाकुमारी, परविन बाबी यांनीही एकाकी जीवन
जगत असताना मृत्यू आला. अशा प्रकारचे अनेक बॉलीवूड कलावंत राजासारखे जीवन
जगले पण त्यांच्या आयुष्याची अखेर रंकासारखी झाली. तर अनेकांना एकाकी जीवन
जगावे लागले. हिंदी चित्रपटसृष्टीचा हा विद्रुप चेहरा नाण्याची दुसरी बाजू
आहे. चकाकते ते सर्वच सोने असते असे जे म्हणतात ते काही खोटे नाही.
अनेक
बॉलीवूड कलावंत राजासारखे जीवन जगले पण त्यांच्या आयुष्याची अखेर
रंकासारखी झाली. तर अनेकांना एकाकी जीवन जगावे लागले. हिंदी
चित्रपटसृष्टीचा हा विद्रुप चेहरा नाण्याची दुसरी बाजू आहे.
भगवान निळे
No comments:
Post a Comment