Friday, June 28, 2013

माफी कुणाला? बिरजू की मुन्नाभाईला ?

 मेहबूब खानच्या `मदर इंडिया’ चित्रपटाच्या पहिल्या दृश्यात एक वृध्दा छोटय़ा कालव्याचे उद्घाटन करते आणि त्या कालव्यातून पाणी वाहायला लागते. पूर्ण गाव खुश असते. मात्र, त्या वृध्देला पाणी लाल होताना दिसू लागते. फ्लॅश बॅकमध्ये दाखवण्यात येते की, युवा डाकू `बिरजू’ एका नवरीला मंडपातून उचलून आपल्या घोडय़ावर घेऊन पळत आहे. त्याची आई राधा त्याला थांबण्याचा प्रयत्न करते आणि गोळी मारण्याची धमकीदेखील देते. मात्र, बिरजू थांबत नाही, त्याला वाटते की मला सर्वात जास्त प्रेम करणारी आई मला गोळी मारू शकत नाही. मात्र, चारित्र्यसंपन्न असणारी आई आपल्या गावातील मुलीला पळवणार्या आपल्या लाडक्या मुलाला गोळी मारते. हे दृश्य आठवण्याचे कारण म्हणजे, नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या मनातील `बिरजू ‘ म्हणजेच त्यांचा मुलगा संजय दत्त. `मदर इंडिया’च्या वेळी नर्गिस दत्त गरोदर होती. पोटात होता `बिरजू’. त्याच संजय दत्तला एके-56 सारखे संहारक शस्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 5 वर्षांची सजा ठोठावल्यामुळे देशातील उच्चभ्रू वर्गाचे मन गलबलून आले आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजूपासून ते महेश भट आणि राज ठाकरेपर्यंत अख्ख्या बॉलिवूडनेही `मुन्नभाई’ची शिक्षा रद्द करावी यासाठी कंबरा कसल्या आहेत. सुनील दत्त आणि नर्गिस आपल्या देशावर प्रेम करत होते आणि त्यांच्या कार्यपद्धतीत आदर्श होता. मात्र, संजय दत्त लहानपणापासून जिद्दी आणि अकारण आक्रोश करीत असे. आईवर जीवापाड प्रेम करणार्या संजयला ती कॅन्सरग्रस्त होताच अमली पदार्थ `एलएसडी’ घेण्याची सवय जडली. हे व्यसन सोडण्यासाठी सुनील दत्तने विदेशात जाऊन त्याचा उपचार केला होता. संजय दत्तच्या आचरणातून फक्त गैरजबाबदार प्रतिमा समोर येते. ती त्याने चित्रपटात साकारलेल्या विविध भूमिकांनींही स्वच्छ होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला शिक्षा होणे ही आनंदाची बाब नसली, तरी दुःख वाटायचेही काही कारण नाही. कारण त्याने केलेली कृती ही राष्ट्रविरोधीच होती. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर देशभरात दंगे उसळले. मुंबईतही या घटनेनंतर छोटे-मोठे हिंसक प्रकार घडले. मुंबईतील जोगेश्वरी येथील राधाबाई चाळीला आग लावण्यात आली व त्यात काही निष्पापांचा बळी गेल्यावर शिवसेनेने मुंबई शहर वेठीस धरले. मग देशभर दंगली उसळल्या. भयभीत झालेल्या असहाय्य मुस्लिमांमधील अस्वस्थतेचा फायदा उठवत पाकिस्तानी आयएसआयने दाऊद इब्राहिमच्या मदतीने मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. संजय दत्तकडे मिळालेली एके 56 रायफल मुंबई बॉम्बस्फोटासाठी आणण्यात आलेल्या शस्त्रामधीलच एक होती. ती नष्ट करण्याचा त्याने प्रयत्नही केला होता. कळत-नकळत किंबहुना अजाणतेपणे त्याने गुन्हा केला असे मान्य केले, तरी त्याला शिक्षा भोगायलाच हवी. कायद्यापुढे सर्व समान आहेत असे आपण भारतीय मानत आलो आहोत. पण तरी काही जण अधिक समान असतात असा पायंडा संजयला शिक्षामाफी केल्यानंतर पडू शकतो. ही भविष्यात अत्यंत वाईट गोष्ट ठरेल. असे असताना आपल्या पक्षाच्या खासदार प्रिया दत्त यांचा भाऊ संजय दत्तने माफीसाठी अर्ज केल्यास केंद्र सरकार त्यात निश्चित लक्ष घालेल, महाराष्ट्राच्या राज्यपालांना एखाद्या कैद्याची शिक्षा रद्द करण्याचा अधिकार आहे, असे केंद्रीय कायदामंत्री अश्विनी कुमार यांनी स्पष्ट केले आहे. त्याची चित्रपट कारकीर्द, समाजकार्य, खटल्यास लागलेला प्रदीर्घ काळ, या काळात झालेला विवाह व मुले, अन्य कोणताही गुन्हा नाही, आदी सर्व मुद्दे न्यायालयीन सुनावणीत मांडले गेले होते. प्रोबेशनच्या अर्जातही ते मांडण्यात आले होते व न्यायालयाने ते फेटाळले होते. सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे. त्यामुळे न्यायालयाने फेटाळलेल्या मुद्यांवर पुन्हा राज्य सरकार किंवा राज्यपालांकडे शिक्षामाफीसाठी याचना करण्याचा काही उपयोग होणार नाही, असे वाटते. न्यायालयातील बचावाच्यावेळी त्याने जे मुद्दे उपस्थित केले होते. तेच मुद्दे पुन्हा माफीसाठी मांडून उपयोग होणार नाही. शिक्षामाफी का द्यावी, याची कारणे त्याला राज्य सरकार किंवा राज्यपालांना अर्जाद्वारे द्यावी लागतील. लोकप्रियता, जनमत किंवा राजकीय दबावामुळे शिक्षामाफी दिली गेली तर कोणीही त्याविरुद्ध उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. सरकार किंवा राज्यपालांना शिक्षामाफीची कारणे आदेशात स्पष्ट करावी लागतील. त्या कारणांसाठी शेकडो अन्य गुन्हेगार माफीचा अर्ज करू शकतील. मग हाच न्याय दिल्ली सामूहिक बलात्कारातील आरोपींनाही द्यावा लागेल. यातील आरोपींचाही पहिलाच गुन्हा होता. तेही म्हणतील, आमच्या हातून अजाणतेपणे सर्व काही घडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या आधारे निकाल सुनावला आहे. या निकालाचा सन्मान करणे आवश्यक आहे. अन्यथा गरिबांसाठी एक न्याय व श्रीमंत, प्रतिष्ठितांसाठी दुसरा न्याय असा गैरसमज निर्माण होईल. संजय दत्तने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातून गांधीजींचा विचार दिला आहे. त्यामुळे त्याला शिक्षा माफ करावी, असे विधान एका महाशयाने केले आहे. पण त्याचे वागणे आणि त्याची कृती तर `बिरजू’सारखी होती. उद्या दाऊद इब्राहिमने गांधीजींवर चित्रपट काढला तर त्यालाही माफ करायचे का? असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संजय दत्तने शिक्षामाफीसाठी धडपड न करणेच शहाणपणाचे ठरेल. त्याच्या शिक्षामाफीसाठी जी मंडळी अश्रू ढाळत आहेत त्यांचे प्रयत्नही निष्फळ ठरतील यात शंका नाही. मात्र, आपल्या देशात काहीही घडू शकते. जर संजय दत्तला शिक्षामाफी मिळाली तर आपण ठामपणे म्हणू शकतो की, `कायदा गाढव आहे.’

No comments:

Post a Comment