Friday, June 28, 2013

सावित्रीच्या लेकींसाठी…


सदासर्वदा पुरूषाच्या मदतीची याचना करणे महिलांनी आता सोडून द्यायला हवे. तसेच, लढाई पुरूषांच्या विरोधात नसून पुरूषप्रधान संस्कृतीच्या विरोधात आहे याचे आत्मभान महिलांना यावे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तिसर्या महिला धोरणाचा कच्चा मसुदा सादर केला आहे. या मसुद्यात मालमत्तेमध्ये महिलांचे नाव लावणे आता बंधनकारक असणार असून अर्जात वडिलांच्या नावाबरोबरच आईचे नावही लावता येईल. सर्व अर्जांत तशा प्रकारचा उल्लेख करण्यात येणार असून तमाशा आणि लोककलांवत महिलांना 40 वर्षांनंतर निवृत्तीवेतन मिळण्याची शिफारस आहे. तसेच, महिला कलावंतांच्या मुलांसाठी आश्रमशाळाही सुरु करण्यात येणार असून देवदासी महिलांना घरकुल मिळणार आहे. इतकेच नव्हे तर, तृतीयपंथियांचा यावेळी पहिल्यांदाच धोरणात समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. मानवसमूहाची जननी असलेल्या महिलांना सन्मान, प्रतिष्ठा, शिक्षण, सुरक्षा, आरक्षण आणि संरक्षण देणार्या या विधेयकामुळे महिलांचा सामाजिक दर्जा सुधारण्यात मदत होईल, अशी इच्छा बाळगण्यास वाव आहे. 72 पानांच्या या मसुद्यात 25 प्रकरणांचा समावेश असून, स्त्रीशक्तीचा जागर महाराष्ट्रात सुरू करण्याचा मानस सरकारने केला आहे. आजपर्यंत उपेक्षिताचे जगणे नशिबी आलेल्या प्रत्येक महिलेला या धोरणात समान हक्काच्या संधीने वरदान’ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये देवदासी, संगीत बारी आणि तमाशा कलावंत, पुरुष कैद्यांच्या पत्नी, तृतीयपंथींच्या जगण्याचा सन्मान वाढविणार्या योजना प्रस्तावित आहेत. यासोबतच सर्व वर्गातील महिलांसाठी स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्प, जाणीव जागृती, शिक्षणसंशोधन, वसतिगृहे, आरोग्य, प्रसाधनगृहे, व्यसनमुक्ती, पर्यावरण, सांस्कृतिक धोरण, महिला कायदा, महिला लोकप्रतिनिधी, बचतगट, असंघटित कामगार, अपंग व मतिमंद महिला, लैंगिक शोषण झालेल्या महिलांना आधार देणार्या योजना प्रस्तावित आहेत. स्त्री म्हणजे कुटुंबाचा, समाजाचाही मूलभूत आधार आहे. केवळ जननी म्हणून नव्हे तर नियामक म्हणूनही. तिचा अंकुश समाजावर असेल तरच दुष्ट प्रवृत्तींना आळा बसेल. हा तिचा अंकुश सध्या बोथट बनल्यानेच स्त्री संकटात आहे. तिचे स्वत्व धोक्यात आहे. अन्याय, अत्याचार, विटंबना, अवहेलनेच्या वावटळीने अनेकींना घेरले आहे. स्त्रीच्या शारीरिक, भावनिक, आर्थिक सुरक्षेचे प्रश्न नवीन नाहीत. वर्षानुवर्षे, दशकानुदशके, शतकानुशतके, कमी-अधिक प्रमाणात ते प्रश्न कायम आहेत. तिला मिळणारी दुय्यम दर्जाची वागणूकही जुनीच. हिंसाचाराच्या घटनांत, सत्तासंपत्तीच्या संघर्षात पहिली बळी जाते ती महिलाच. स्त्री आणि पुरुषाची तुलना करणारे, स्थान व कर्तबगारीचे वाटप करणारे, दोघांमध्ये श्रेष्ठत्वाची स्पर्धा लावून देणारे, अनावश्यक संघर्षाची मांडणी करणारे, कालबाह्य रूढी, प्रथा परंपरांचाही आग्रह धरणारे, त्यातील स्त्रीच्या दुय्यम स्थानाचा पुरस्कार करणारे, मुलगी-पत्नी-आई अशा तिन्ही टप्प्यांवर ती सतत आश्रित असणेच योग्य मानणारे धर्माचे ठेकेदार आणि बुरसट विचारांना चिकटून बसलेले सनातनी विचाराचे संस्कृती रक्षक यांच्या गुलामगिरीतून प्रथमतः महिलांची सोडवणूक करायला हवी. नवे युग संधींचे आणि त्यावर स्वार होण्याचे आहे. ज्यांच्या अंगी क्षमता त्यांनी पुढे जाण्याचे हे युग आहे. हे युग समतेचे, साहचर्याचे आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी असल्याने नैसर्गिक न्यायतत्त्वाने स्त्री पुढे जात राहील यात शंका नाही. जग तिच्याविषयी, तिच्या क्षमतेविषयी, कर्तबगारीविषयी काय म्हणते, यापेक्षा तिचा स्वतःवर किती विश्वास आहे, हे अधिक महत्त्वाचे. तिच्या आत्मप्रेरणा अधिक महत्त्वाच्या आहेत. मी सक्षम आहे, सबळ आहे, हे प्रथम तिला वाटायला हवे. मग इतरांना ते आपोआप पटेल यात दुमत नाही. घरातूनच महिलांची प्रतिष्ठा, आत्मसन्मानाचा प्रारंभ व्हायला हवा. त्यासाठी प्रत्येक निर्णयात तिचा सहभाग आवश्यक असणे गरजेचे आहे. कुटुंब, संसार, शेती, व्यवसायासारखी उपजीविकेची साधने, जिथे महिलांचा सहभाग आहे, तिथे प्रगतीच होते, हा अनुभव असल्याने महिलांना कार्यप्रवण करण्याची गरज आहे. तिचा वाटा तिला मिळू देण्याची गरज आहे. पण, हा वाटा मिळविण्यासाठी पहिले पाऊल स्त्रीने उचलण्याची गरज आहे. महिला आणि पुरूष यांच्यात समानता नांदावी यासाठी महिला दुर्बल आहेत या विचाराला प्रथम तिलांजली द्यायला हवी. महिलांनीही आम्ही पुरूषांच्या तुलनेत तसूभरही कमी नाहीत याची सतत जाणीव ठेवायला हवी. निसर्ग नियमानुसार महिला पुरूषांच्या तुलनेत केवळ शारिरीकदृष्टय़ा कमी असतात. पण बळ, हिम्मत, जिगर असते ती मेंदूत. तुमच्या विचार करण्याच्या पध्दतीत. मानसिक बळ हे शारीरिक बळापेक्षा नेहमीच उजवे असते. सदासर्वदा पुरूषाच्या मदतीची याचना करणे महिलांनी आता सोडून द्यायला हवे. तसेच, लढाई पुरूषांच्या विरोधात नसून पुरूषप्रधान संस्कृतीच्या विरोधात आहे याचे आत्मभान महिलांना यायला हवे. स्त्री आणि पुरूष ही संसाराच्या गाडय़ाची दोन चाके आहेत असे बोलण्यापुरते बरे वाटते. खर्या अर्थाने विचार केला तर परिस्थिती वेगळीच आहे. स्त्री आणि पुरूष ही सायकलची दोन चाके आहेत. पुढचे चाक म्हणजे पुरूष आणि मागचे चाक म्हणजे महिला. कोठे जायचे? कधी थांबायचे? याचा निर्णय पहिले चाक घेते. मागचे चाक त्याच्या मागे फरफटत जाते. संसाराचा सगळा भार मात्र मागच्या चाकावरच असतो. हे आता बदलण्याची वेळ आली आहे. संसाराचा गाडा, रथ आता समान चाकांवर खेचायला हवा. सायकलीऐवजी रथाने आता जागा घ्यायला हवी. अन्यथा कितीही धोरणे जाहीर करून त्यांची अंमलबजावणी जरी केली तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही.

No comments:

Post a Comment