ज्येष्ठ
रंगकर्मी, अभिनेते, दिग्दर्शक सुहास भालेकर शनिवारी पहाटे काळाच्या
पडद्याआड गेले. बारीक अंगकाठी, अभिनयाच्या चंदेरी दुनियेत होणारा पदोपदी
अवमान, अभिनयावर असलेला विश्वास, 60 वर्षांचे अभिनयाचे करिअर, मराठी नाटके,
वगनाटय़े, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी मालिका यांची लांबच लांब
रांग हे अनोखे मिश्रण जुळून आणले ते म्हणजे सुहास भालेकर या नटाने. नाटकात
काम करणे हे करिअर सोडाच पण लज्जास्पद आहे, असे वाटणार्या काळात जन्माला
आलेला साबाजी पुढे मराठीतला उल्लेखनीय कलाकार `सुहास भालेकर’ होतो ही
एखाद्या चित्रपटात शोभेल अशी पटकथा आहे. या जातीवंत मराठी तार्याला अखेरचा
मानाचा मुजरा. कामगार वस्तीतल्या बालपणीच मनावर झालेले नाटकांचे गारूड
वयाची 80 उलटली तरी त्यांच्या मानगुटीवरून उतरले नव्हते. अलीकडे सुरू
असलेल्या झी वाहिनीवरील `असंभव’ या मालिकेत वयाच्या 82 व्या वर्षीही उत्तम
अभिनय कशाशी खातात याचे उदाहरण देणारे `सोपानकाका’ रसिकांच्या कायम लक्षात
राहतील. बारीक अंगकाठी असल्याने केवळ विनोदी भूमिका वाटय़ाला येणारे
भालेकर यांनी आपल्या अभिनयकौशल्याने अलेल्या संधीचे सोने केले. कीर्तनकार
वडिलांकडून आलेली शुद्ध वाणी आणि मुलाचे स्वप्न समजून घेणारी आई
यांच्यामुळे मराठी कलासृष्टीला सुहास भालेकरांसारखा जिद्दी नट मिळाला.
`शाहीर साबळे आणि पार्टी’त 16 वर्षे कलाकार आणि माणूस म्हणून घडत जाणार्या
भालेकरांनी लोकनाटय़ातला चौकसपणा, संगीत नाटकातला `तळीराम’चा खलनायकी
अभिनय, विजया मेहतांचा शिस्तबद्धपणा, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे,
सचिन पिळगावकर या चित्रपटातल्या पिढीसोबत काम करण्याचा लवचिकपणा अंगात
भिनविला होता. आपल्या विविधढंगी भूमिकांनी जुन्या व नव्या पिढीच्या मनात घर
करून राहण्याचे कसब भालेकरांनी चांगलेच अवगत केले होते. शाहीर साबळेंपासून
विजया मेहतांपर्यंत आणि व्ही. शांताराम यांच्यापासून ते महेश भट्टांपर्यंत
अनेक दिग्गजांबरोबर सुहास भालेकर यांनी काम केले. पंतांची सून, छापील
संसार, एकच प्याला, बेबंदशाही, अंमलदार इत्यादी नाटकं. यमराज्यात एक
रात्र, मीच तो बादशाह, फुटपायरीचा सम्राट, कोंडू हवालदार इत्यादी वगनाटय़े.
झुंज, चानी, आई, निवडुंग, अष्टविनायक इत्यादी मराठी चित्रपट. शक, चक्र,
सारांश, दामिनी, बरसात इत्यादी हिंदी चित्रपट आणि गोटय़ा, भाकरी आणि फूल,
असंभव, कशाला उद्याची बात, वहिनीसाहेब या मालिका अशी 60 वर्षांच्या
कारकीर्दीची लांबलचक यादी सुहास भालेकर यांच्या नावावर आहे. `आंधळ दळतंय’
या लोकनाटय़ात हुतात्मा चौकाजवळ राहणार्या एका पाटीवाल्याची सुहास यांनी
साकारलेली भूमिका मनाला चटका लावणारी होती. `शिवसेनेच्या प्रसूतीवेदना’
हेही त्यांचे लोकनाटय़ गाजले होते. बाळासाहेबांनी त्यांच्या या भूमिकेचे
मनापासून खूपच कौतुक केले होते. `पंतांची सून’, `एकच प्याला’, `भावबंधन’
`तुझे आहे तुजपाशी’, `अंमलदार’, `बेबंदशाही’, `राजकारण गेलं चुलीत’,
`फुलाला सुगंध मातीचा’ ,`अजब न्याय वर्तुळाचा’,`येडय़ांची जत्रा’, अशा अनेक
नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. तसेच काही नाटकांचे
दिग्दर्शनही केले होते. खलनायकाला साजेशी देहयष्टी त्यांच्याकडे नसतानाही
केवळ आपल्या अंगभूत अभिनयाच्या बळावर त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या.
अभिनयाचे शिक्षण त्यांनी कोठल्याही विद्यापीठातून घेतले नव्हते. हा गुण
त्यांच्यात उपजतच होता. जवळपास 60हून अधिक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका करून
नाटय़क्षेत्रात प्रदीर्घकाळ आपले अधिराज्य गाजवले होते. हौशी रंगभूमीवरून
व्यावसायिक तसेच लोकनाटय़ आणि मुक्तनाटय़ यामधील त्यांचा नाटय़प्रवास
पाहिला तर तेंडुलकर आणि सई परांजपे, विजया मेहता तसेच साबळे या
दिग्गजांच्या सहवासात त्यांची नाटय़क्षेत्रांतील या लोकसंस्कृतीच्या
उपासकाची वाटचाल अधिकाधिक गतीमान हेत गेलेली दिसते. हौशी रंगभूमीवरील
त्यांची सुरुवातीची वाटचाल त्यांच्या जीवनात दिशादर्शक ठरली होती. अत्यंत
साधेपणाने राहणारा आणि चारचौघात चारचौघांसारखाच राहणारा हा नट आयुष्याच्या
शेवटपर्यंत कलाकार म्हणूनच जगला. तरूण, होतकरू, हौशी कलावंतांना जवळ घेऊन
त्यांना आपल्या अनुभवाची शिदोरी वाटण्यात त्यांना नेहमीच अत्यानंद होत असे.
मराठी रंगभूमी, चित्रपट, आणि मालिकांवर आपल्या अभिनयाची स्वाक्षरी करून
गेलेल्या सुहास भालेकर यांनी आपल्याची सर्वसामान्य माणूस जो ` साबाजी’ या
नावाने जन्माला आला तो मात्र शेवटपर्यंत जपला हे विशेष.
No comments:
Post a Comment