अडवाणी
यांच्यापेक्षा जहाल चेहरा भाजपच्या हाती लागला आहे.सत्तेच्या जवळ घेऊन
जाणारा शॉर्टकट भाजपला सापडला असल्याने अडवाणी यांच्यासारखा ज्येष्ठ नेता
बाजूला फेकला जात आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आगामी
लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपच्या प्रचार समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे.
पक्षातील बहुमताचा विचार करून हा निर्णय घेण्यात
आल्याचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सांगितले असले तरी ते पूर्ण सत्य
नाही. पक्षाचे ज्oयष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा, मुरली मनोहर
जोशी , विनय कटियार, रविशंकर प्रसाद, शत्रुघ्न सिन्हा, बी.सी. खंडुरी,
जसवंतसिंह, उमा भारती यांच्या अनुपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मोदींकडे निवडणूक प्रचार समितीची धुरा सोपवण्यावरून पक्षात मतभेद होते व ते
अद्याप शमले नाहीत. हे वास्तव आहे. राजनाथ यांच्या मते विधानसभा,
लोकसभेसाठी एकच प्रचार समिती असावी, आणि त्याचे प्रमुखपद मोदींना द्यावे.
मात्र, अडवाणींना ते मान्य नव्हते. त्यावरून भाजपात मोदी विरूध्द अडवाणी
असे शीतयुद्ध सुरु झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींच्या मागे उभा
असल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. गेली 62 वर्षे जनसंघ, जनता पार्टी आणि
भारतीय जनता पक्षात इमानेइतबारे काम केले, त्या अडवाणींसारख्या राजकीय
नेत्याला त्यांनीच आपल्या छत्रछायेखाली लहानाचे मोठे केलेल्या नरेंद्र मोदी
नावाच्या शिष्याने पुरते कोंडीत पकडले आहे. संघाच्या दबावामुळे अडवाणींना
वजा करूनही बेरजेचे राजकारण करता येऊ शकते असा संदेश मोदींच्या नियुक्तीने
भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचला आहे. एकेकाळी संसदेत दोन
खासदारांची संख्या एका फटक्यात 88 करण्याची किमया करणार्या अडवाणींची
मेहनत. दूरदृष्टी. भाजपाला राष्ट्रीय पटलावर घेऊन आली होती. रथयात्रा काढून
बाबरी मशीद उद्ध्वस्त करून भाजपाला सत्तेवर आणणार्या अडवाणीना मात्र सत्ता
आली तेव्हा पंतप्रधान होता आले नाही. त्यांचा जहाल हिंदुत्ववादी चेहरा
नडला. आघाडी सरकारात मवाळ चेहरा हवा असतो. अटलबिहारी वाजपेयींकडे तो होता.
पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणार्या अडवाणींसाठी 2014 ची निवडणूक शेवटची
संधी आहे. उतारवयात एकदातरी पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान व्हावे अशी
अडवाणींची मनीषा आहे. पण त्यांच्याच मानसपुत्राने आता त्यात खोडा घातला
आहे. हे अडवाणींचे मोठे दुर्दैव आहे. जे नरेंद्र मोदी संघाचे काम करताना
मोटरसायकलवर फिरून अडवाणींच्या रथयात्रेत घोषणा देत होते,त्यांनी
अडवाणींच्या नंतर निघालेल्या परिवर्तन यात्रेची सुरुवात गुजरातमधून करू
दिली नाही. गुजरातमध्ये जन्मलेल्या महंमदअली जीना यांना पाकिस्तानात जाऊन
निधर्मी ठरविणार्या अडवाणींपासून मोदी यांनी फारकत घ्यायला सुरुवात केली
होती. त्याच मोदींनी आता अडवाणींना घरी बसविण्याचा विडा उचलला आहे. ताज्या
इतिहासावर नजर टाकली असता पक्षांतर्गत विरोधाला न जुमानता अडवाणींनी
मोदींना गुजरातच्या गादीवर बसविले होते. परंतु मोदींनी प्रखर हिंदुत्वाला
जागून गुजरातेत मुस्लिमांचे हत्याकांड केले असता पंतप्रधान वाजपेयींनी
त्यांना `राजधर्म’ पाळण्याचा सल्ला दिला होता. गोव्यातच मोदींना हटविण्याची
तयारी पूर्ण झाली असता भीष्माचार्य वाजपेयींची इच्छा डावलून
पुत्रपप्रेकापोटी पागल झालेल्या ध्रृतराष्ट्र अडवाणींनी मोदी नामक
दुर्योधनाला आपल्या पंखाखाली घेतले. तेच ` राजधर्म ‘ न पाळणारे मोदी आज
भाजपाचे हिरो झाले आहेत. अडवाणी यांच्यापेक्षा जहाल चेहरा भाजपच्या हाती
लागला आहे.सत्तेच्या जवळ घेऊन जाणारा शॉर्टकट भाजपला सापडला असल्याने
अडवाणी यांच्यासारखा ज्येष्ठ नेता बाजूला फेकला जात आहे. ही वाजपेयी-अडवाणी
युगाच्या अंताच्या प्रारंभाची नांदी आहे. आपले अर्धे आयुष्य तुरूंगात
घालवून दक्षिण अफ्रिकेत क्रांती घडवून आणणारे नेल्सन मंडेला वृध्दावस्थेकडे
झुकताच स्वतःहून राजकारणातून वेगळे झाले. अशी अपेक्षा 85 वर्षाच्या अडवाणी
व अन्य वृध्द राजकारण्यांकडून करता येत नाही, हे आपले दुर्दैव आहे. भारतीय
राजकारणात एका विशिष्ट समुहाचे, पंथाचे, जातीचे, धर्माचे राजकारण करून
दिल्लीचे तख्त काबिज करता येत नाही. त्यासाठी सर्वधर्म समभाव असलेला चेहरा
हवा असतो. अठरा पगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारा नेता आवश्यक
असतो. नरेंद्र मोदी यांनी आपण विकासपुरूष असल्याची आपली जाहिरात केलेली
असली तरी 2002 च्या गुजरात दंगलीचा इतिहास त्यांच्या चारित्र्याला चिकटलेला
आहे. तो पूर्णतः पुसून टाकण्यात ते अद्याप यशस्वी झालेले नाहीत. मोदी
यांनी आपल्या स्वतःच्या चेहर्याला ओळख करून दिली खरी, पण हा चेहरा भाजपाचा
नाही. त्यामुळेच `रालोआ’तील जेडीयू व शिवसेनेसह अन्य घटक पक्षंानाही
मोदींचे वावडे आहे. कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सत्तेत येण्याची
परिस्थिती आज राहिलेली नाही. राज्या-राज्यात प्रादेशिक पक्ष प्रबळ बनले
आहेत. हे पक्ष `संपुआ’ व `रालोआ’त विभागले आहेत. हीच प्रादेशिक पक्षांची
अनिवार्यता आहे. झारखंड, छत्तीससगड, मध्यप्रदेश या राज्यातील येणार्या
निवडणुकांमध्ये मोदी यांच्या नेत्तृत्वाची खरी कसोटी लागणार आहे. त्यानंतर
2014 साली येणार्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कशी परिस्थिती निर्माण होते
यावरही बरेचसे अवलंबून आहे. `रालोआ’ बहुमताच्या आसपास पोहचला तर ऐनवेळी
सुषमा स्वराज किंवा अरूण जेटली हेही पंतप्रधान होऊ शकतात. कारण, प्रमोद
महाजन यांना निवडणूक प्रचार प्रमुख केले असतानाही वाजपेयी पंतप्रधान बनले
होते हा इतिहास आहे. `काँग्रेस मुक्त भारत’ निर्माण करणाच्या संकल्पाऐवजी
मोदींनी आधुनिक, भ्रष्टाचारमुक्त, बलशाली भारत निर्मितीसाठी पुढाकार
घ्यायला हवा. गुजरात म्हणजे भारत नाही हे त्यांनी ध्यानी घ्यायला
हवे.त्यांना प्रथमतः स्वपक्षातील दुही कमी करावी लागेल. तसेच, जगाला
उड्डाणपुलाचे तंत्रज्ञान देणार्या हिटलरच्या कुकर्माला अद्याप जगाने माफ
केलेले नाही, याचे भान ठेवून आपली प्रतिमा निधर्मी करावी लागेल.
जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचे राजकारण बाजूला सारून
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लवकरात लवकर आपल्यापासून दूर कसे ठेवता येईल
यावर मोदींचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
No comments:
Post a Comment