[Published]
Tags: लेख
.
माजी आमदार `पद्मश्री’ लक्ष्मण माने यांच्यावर त्यांच्याच संस्थेत काम
करणार्या पाच स्वयंपाकीण महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप झाला आहे. 2003
ते 2010 या सात वर्षात `उपरा’कारांनी आपल्यावर वेळोवेळी बलात्कार
केल्याची तक्रार या महिलांनी केली आहे. बदलीची भीती दाखवून आणि नोकरीत
कायमस्वरूपी सामावून घेण्याचे आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार
केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लक्ष्मण माने यांची सातारा येथील जकातवाडी
येथे भटक्या विमुक्त समाजासाठी शारदाबाई पवार या संस्थेची आश्रमशाळा आहे.
तक्रारदार महिला या माने यांच्या आश्रमशाळेत काम करणार्या आहेत. अगोदर
तीन महिलांनी लक्ष्मण माने यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर
दोनच दिवसात आणखी दोन महिलांनी तशाच स्वरूपाचे आरोप केले. आठवडय़ाभरात पाच
महिलांनी एकाच माणसावर बलात्काराच्या आरोप केल्याची ही देशातील पहिलीच
घटना असावी. बदलीची भीती दाखवून अथवा नोकरीत कायमस्वरूपी सामावून घेण्याचे
आमिष दाखवून माने यांनी खरोखरच या महिलांचे लैंगिक शोषण केले असेल, तर ते
निषेधार्थ आहे. मात्र, प्रख्यात दलित साहित्यिक लक्ष्मण माने यांना बदनाम
करण्याचा कुणा हितसंबंधितांचा कट असेल तर तोही निंदनीय असाच आहे. गेल्या
दहा वर्षापासून लक्ष्मण माने महिलांवर अत्याचार करीत असतील तर पिडीत महिला
एक दशक उलटेपर्यंत अत्याचार का सहन करत होत्या, हा प्रश्न आहे. तसेच, या
पाच महिला एकाचवेळी तक्रार दाखल करायला कशा धजावल्या हाही संशोधनाचा भाग
आहे. आदिवासी अथवा भटक्या – विमुक्त समाजात `सेक्स’ला विशेष महत्व देण्यात
येत नाही. या समाजात लैंगिकतेकडे स्वच्छ आणि निकोप दृष्टीकोनातून पाहिले
जाते. त्यामुळेच आदिवासी किंवा भटक्या-विमुक्त समाजात बलात्काराची प्रकरणे
घडत नाहीत. आदिवासी किंवा भटक्या-विमुक्त महिलेवर धनदांडगे, सावकार,
जमीनदार, पोलिस, सरकारी अधिकारी बलात्कार करतात, हे वास्तव आहे. मात्र याच
समाजातील पुरूष आपल्या समाजातील अथवा अन्य समाजातील महिलांवर कधी लैंगिक
जबरदस्ती करीत नाही. या गोरगरीब अशिक्षित समाजात नीतीमूल्याचे विष अद्याप
पेरले न गेल्यामुळे सेक्सकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन निकोप आहे. या
समाजातील महिला आणि पुरूषांचीही धर्माच्या नावाखाली लैंगिक कोंडी करण्यात
येत नसल्याने, त्यांना आपली लैंगिक भूक शमविण्यासाठी ओरबाडावे लागत नाही.
लक्ष्मण माने यांना आता त्यांच्या समाजाचा एक घटक मानायचे किंवा नाही हा
वादाचा भाग आहे. माने जन्माने `भटके’ असले तरी आता ते `स्थायिक’ झाले
आहेत. माने यांच्यातही सुशिक्षित समाजाच्या अनेक वाईट चालीरिती संचारल्या
असल्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्ष्मण माने हे `राम’ नसले तरी
`श्रीकृष्ण’ नक्कीच नाहीत हे त्यांना ओळखणार्या लोकांना ठाऊक आहे. उद्या
बलात्काराच्या आरोपातून माने यांची निर्दोष मुक्ताता जरी झाली, तरी
त्यांच्या प्रतिमेवर हा जो डाग लागला आहे तो सहजासहजी पुसला जाईल असे वाटत
नाही. लक्ष्मण माने यांनी बदलीची भीती दाखवून आणि नोकरीत कायमस्वरूपी
सामावून घेण्याचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले असेल, तर पिडीत महिलांनी
त्यावर त्याचवेळी आवाज उठवायला हवा होता. लैंगिक शोषणाच्या आपल्या
कायद्यातच मुळात अनेक त्रुटी आहेत. दहा वर्षानंतर कुणी लैंगिक अत्याचार
झाल्याची आवई उठवू लागले, तर देशातील निम्मे पुरूष तुरूंगात जातील. देशातील
किती आमदार, किती खासदार, किती नगरसेवक, किती मंत्री, किती पोलिस
अधिकारी, किती वकील, किती पत्रकार, किती नेते, किती पुढारी, किती
समाजसेवक `एक पत्नी’ आहेत? जो सापडला जातो, जो अडकविला जातो तो गुन्हेगार
ठरतो, जो सापडत नाही तो सभ्य गणला जातो. साहित्य अकादमीचा पुरस्कार
प्राप्त झालेले 63 वर्षीय लक्ष्मण माने हे विधान परिषदेचे माजी सदस्य असून
भटक्या -विमुक्त समाजाचे ते नेते आहेत. पाठीवर बिर्डाड घेऊन पोटापाण्यासाठी
गावोगाव फिरणार्या भटक्या-विमुक्त समाजाचे वास्तववादी विदारक चित्र
लक्ष्मण माने यांनी मराठी साहित्यात पहिल्यांदाच रेखाटले. भटक्यांची वेदना
समाजासमोर आल्यानंतर सरकारदरबारी त्यांच्या वेदनेला वाचा फोडण्यात आली. या
भटक्या – विमुक्त मंडळींना संघटीत करण्याचे काम लक्ष्मण माने कित्येक
वर्षे करीत असून सरकारी कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत राबविण्याचाही
त्यांचा प्रयत्न आहे. लक्ष्मण माने हे राजकारणीही असून ते धुतल्या
तांदळासारखे आहेत, असा दावा कुणीही करणार नाही. लक्ष्मण माने
यांच्यासारख्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिकाचे नाव या
प्रकरणात गुंतले असल्याने त्याला (नाहक) प्रसिध्दी मिळेल व आपला फायदा
होईल, या कल्पनेने जर कुणी हा चहाटळपणा केला असेल तर चौकशीअंती तो सामोरा
येईलच. पण लक्ष्मण माने यांनी खरोखरच `लक्ष्मण रेषा’ ओलांडली असेल आणि या
महिलांवर त्यांच्या इच्छेविरूध्द बळजबरी करून लैंगिक अत्याचार केला असेल तर
कायद्यानुसार त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. आता कायदाही बदलला आहे. दोषी
व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा ठोठावण्यात येते. पण, त्यांच्यावरील हे आरोप
खोटे ठरले तर या तक्रारदार महिलांसोबत त्यांचा वापर करण्या मंडळींनाही कठोर
शिक्षा व्हायला हवी. कारण चारित्र्यहनन हा सुध्दा बलात्काराइतकाच गंभीर
गुन्हा मानायला हवा. आपल्याकडे अजून कायद्याने चारित्र्यहनन हा
बलात्काराइतका गंभीर गुन्हा मानला जात नाही. त्यामुळेच ऊठसूठ एखाद्याच्या
चारित्र्याचे हनन करण्यात अनेकजण आघाडीवर असतात, त्यालाही आळा बसला पाहीजे
No comments:
Post a Comment