माझ्या कवितेतील संदर्भ शोधताना
तिची दमछाक होते
नि, स्वत:ला सावरता सावरता
तिच्या कल्पनेच्या भिंती ढासळत जातात आपसूक.
कवितेमधील हरेक शब्दाच्या विळख्यातून
बाहेर पडन्याचा ती प्रयत्न करते
अन्,
त्यात स्वत:ला अधिकच गुरफटून घेते.
माझी कविता
कधीच हिरमुसून जात नाही
तिच्या जिवाच्या आट्यापिट्यानं
उलट
कवितेच्या ओळीओळीला
तलवारीच्या पात्याचं रूप येत जातं.
अशावेळी ती मला
तलवारीच्या पात्यावर
थरथरणार फुलपाखरासारखी दिसते.
माझ्या कवितेतून
मी मोजू शकतो
तिच्या तकलादू जगाच्या मर्यादित सीमारेषा
नि, समजू शकतो
तिच्या आदिम संकल्पना.
मी पाहतो
तिच्या मे न्दुची होत चाललेली वाताहत
नि, अनुभवू शकतो
चार भिंतींच्या आतील तिची घुसमट
ज्याविरूध्द
माझी कविता बोलते.
तिच्या ठसठसणार्या जखमेवर बोट ठेवते
तिला माणसांच्या चेहर्याची ओळख करून देते
तिला नव्या जगाचं
नवं तत्वज्ञान सांगते.
तलवारीच्या पात्याची
आता तिला सवय झाल्याचं एैकतोय!
No comments:
Post a Comment